भले कितीही मतभेद असू देत, मेवा मिळणार असेल तर सर्वजण एकजण होतात. अगदी सामान्यातील सामान्य माणसालाही हे लागू आहे. मग भाजप-शिवसेना तरी याला कशी काय अपवाद ठरू शकेल? दुर्लभ सत्तासुंदरी अनपेक्षीतरित्या मिठीत आल्यावर तिला कोण सहजासहजी सोडेल? सत्तेची ऊबच अशी आहे की, तिला सोडून गारठ्याचा अनुभव कोणीही घेणार नाही. यातूनच गेली साडेचार वर्षे अगदी हमरीतुमरी केलेल्या या पक्षांनी पुन्हा युतीसाठी नगारे वाजविले आहेत. लेकिन जनता बहोत समझदार है, सब जानते है!
सध्याच्या घडीला राजकारणात भारतीय जनता पक्षाचा हात कोणी धरू शकत नाही. भले अगदी शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेली काँग्रेस आणि 50 वर्षांची संसदीय कारर्कीर्द असलेल्या जाणता राजाची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा! भाजप आणि त्यांच्याकडून डावपेच शिकण्यासारखे आहेत. कोणाशी संगत करायची? किती काळापुरती करायची? कशी करायची? दूर कधी लोटायचे? याची अचूक वेळ साधण्याची त्यांची कला अफलातून आहे. विधी मंडळाच्या अंतिम हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाच, शिवाय तसा कायदाच बनवून त्याच्या अंमलबजावणीसही प्रारंभ केला. विरोधी पक्षांच्या हातात पिपाण्याच उरल्या. युतीबाबतही तेच झाले आहे. सत्ता मिळाल्यावर शिवसेनेला असे काही छिडकारण्यास सुरूवात केले की, संताप करण्यापलिकडे सेना काहीही करू शकली नाही. उलट लोकसभा निवडणुकीला चार-सहा महिन्यांचा अवधी असताना भाजप सांगेल तसे निमूटपणे ऐकू लागली आहेच नव्हे तर वागूही लागली आहे. कारण सेना आपला विषय नसतानाही अयोध्याला गेली.
प्रत्येक सभा सभांतून व्यक्त होणार्या बाणेदारपणाच्या टोकदार मिशा अचानक गळाल्या कशा? मग कशासाठी इतकी वर्षे आकांडतांडव करत बसलात? आता यातून भाजपने आपली प्रतिमा सोज्वळ आणि कामसू अशीच ठेवली. स्वत: कोणतेही आरोप न करता भांडकुदळपणाचा शिक्का सेनेवर ठेवला. यालाच म्हणतात राजकारण! सेना सुतासारखी सरळ झाली असून भाजपच्या तालावर उघड ढोल वाजविण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजतील संत सेवाला महाराज मंदिर परिसरातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात फडणवीस आणि ठाकरे यांनी नगारा वाजविला. इतकेच नव्हे तर एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. यात फडणवीसांनी वेगळे काही केले असे वाटले नाही, कारण त्यांनी राज्याच्या कारभार हातात आल्यापासून आरोपात पाऊल घसरू दिले नव्हते. आश्चर्य याचे आहे की, ठाकरे यांच्यात इतका बदल झाला कसा काय? ही सुद्धा फडणवीसांचीच कमाल आहे. कारण विधान परिषद निवडणुकीपूर्वी बोलताना ते म्हणाले होते, आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप हे स्वतंत्रपणे लढले तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. मात्र, शिवसेनेला जास्त दणका बसेल, आमच्या केवळ चार-पाच जागा इकडे तिकडे होतील. यातूनच जो काही बोध घ्यायचा तो सेनेने घेतला होता. मात्र, लगेच तो अंगिकारला तर पळपुटेपणा ठरेल असे वाटल्याने घटस्फोटावर ठाम आहोत असे ते दाखवत राहिले. मग, भाजपने शिवसेनेचा तोरा हळूहळू कमी करून मस्तकावर डुलणारा तुरा कसा काढला जाईल याची तयारी सुरू केली. मग नगारा वाजविल्यावर अब उँट आ गया पहाड के नीचे! असा डांडोरा सोशल मिडियावर पिटण्यास भाजपवाल्यांनी सुरूवात केली आहे. नगारा वाजविण्याच्या आदल्याच दिवशी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे यांनी एकाच मोटारीतून नाशिकमध्ये प्रवास केला होता.
बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी फडणवीस आणि ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाडीने जाण्याऐवजी प्रोटोकॉल बाजूला ठेवत ठाकरे यांच्यासोबत बुलेट प्रुफ टाटा सफारीतून कार्यक्रमास हजेरी लावणे पसंद केले. शिवसेनेला याचे मोल वाटत असले तरी फडणवीसांनी यात बाजी मारली हे नक्की. फडणवीस यांनी आजपर्यंत युतीविषयी नेहमी सकारात्मकच वक्तव्य करत स्वबळावर लढण्याची सतत धमकी देणार्या सेनेची प्रतिमा कमी आणि आपली उजळ करण्याचा मोका एकदाही सोडला नाही. एवढे जरी असले तरी सेनेच्या ताकदीचा अंदाज असल्यानेच निदान लोकसभेपर्यंत न दुखविण्याची भूमिका ठेवली आहे. चार राज्यांचे निकाल आता लागतीलच. त्यामध्ये काय होते पाहूनच शिवसेनेला धुडकायचे की आम्ही तुमच्यासमोर नमतेच आहोत हे दाखवायचे हे ठरविले जाईल. कारण मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढल्यावर भाजपला 82, तर सेनेला 84 जागा मिळाल्या होत्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 123 व शिवसेनेला 63 जागा, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला 23 व शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. परंतू, सध्याचे वातावरण पाहता दोन्ही पक्षांना फारशी पुरक नसल्याने जागा वाढविण्यापेक्षा आहे त्या जागा टिकविण्यावर भर राहणार आहे. कारण अलिकडे एका वृत्तवाहिनेने केलेल्या सर्व्हेक्षणात असे समोर मांडले होते की, दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुक एकत्रित लढविली तर 48 पैकी 36 जागा जिंकू शकतात. मागील वेळी 42 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 25 वर्षांचा हा दोस्ताना लोकसभा पुरता तरी संपुष्टात येईल असे वाटत नाही. कारण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी वैचारिक समानता असणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. तसेच भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे.
शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. भाजपच्या कमळ या चिन्हावर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक यांनी निवडणुक लढवली होती. पण तरीही युतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी शिवसेनेशी युती केल्यानेच हा पराभव झाल्याची टीका भाजपच्याच काही नेत्यांनी केली होती. त्यामुळे विधानसभेत युती न करण्याचा निर्णय भाजपने घेतला. भिवंडी येथे 1984 साली जातीय दंगल झाली आणि शिवसेनेने मराठीचा मुद्दा काहीसा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. त्याचवेळी भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही ‘अब हिंदू मार नही खायेगा’, अशी भूमिका घेतली आणि हिंदुत्वाच्या आधारावर या दोन पक्षांची युती झाली. त्यानंतर 1989 मध्ये झालेली भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ऐतिहासिक ठरली. या बैठकीत भाजपने दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. त्यापैकी एक निर्णय होता. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करण्याचा. 1995 साली युतीचे महाराष्ट्रात सरकारही आले. पुढे 1999 ते 2009 या 15 वर्षाच्या काळात युती सत्तेपासून दूर होती. 2014 मध्ये वेगवेगळे लढून झाल्यावर पुन्हा सत्तेसाठी एकच झाले. त्यामुळे वेगळे लढल्यावर लहान भावाची भूमिका राज्यात स्विकारावी लागते हे समजल्याने सेनेसमोर युती केल्याशिवाय पर्याय दिसत नाही. यातूनच नगारा पिटला जात आहे.