…तरीही काही विद्यार्थी संघटना दाखल?

0

‘फर्ग्युसन’मध्ये व्याख्यान रद्द होऊनही दहशत माजविण्याचा प्रयत्न; आयोजक विद्यार्थ्यांचा आरोप

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयातील बी.जी. कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाबाबत वाद निर्माण झालेला असताना गुरुवारी पुन्हा महाविद्यालयात तणाव निर्माण झाला होता. गुरुवारी होणारे अमोल मिटकरी यांचे व्याख्यान रद्द केलेले असताना आरएसएस, बजरंग दल आणि अभाविपकडून महाविद्यालयात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काहीकाळ महाविद्यालयात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘भारतीय राज्यघटना’ या विषयावर कोळसे-पाटील यांचे तर ‘धर्मनिरपेक्ष राजा : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर प्रा. मिटकरी यांच्या व्याख्यान ठेवले होते. कोळसे-पाटील यांच्या व्याख्यानाच्या दिवशी वाद निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनी मिटकरी यांचे व्याख्यान रद्द केले होते. असे असताना सकाळी अकराच्या सुमारास आरएसएस, बजरंग दल आणि अभाविपचे काही लोक आणून विद्यार्थ्यांवर दहशत ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप व्याख्यानाचे आयोजन केलेल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

ओळखपत्र तपासले जाते

सुनील जाधव म्हणाला, बी. जी. कोळसे पाटील व अमोल मिटकरी यांचे व्याख्यान रद्द करण्यात आले. तरी सुद्धा आरएसएस, बजरंग दल आणि अभाविपचे लोक महाविद्यालयात आले होते. एकप्रकारे विद्यार्थ्यांना दहशतीत ठेवण्याचा हा प्रकार आहे. सुजित काटे म्हणाला, महाविद्यालयात येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासले जात आहे. परंतु आरएसएस, बजरंग दलाच्या लोकांना कुठलीही विचारणा करण्यात आली नाही. त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.