तरुणांना मारहाण करुन दुचाकीसह रोकड लांबविली

0

मेहरुण तलाव परिसरातील घटना

काही तासातच दोन संशयितांचा अटक इतर फरार

जळगाव : शहरातील मेहरूण तलाव परिसरात दोन तरुणांना मारहाण करत तीन जणांनी त्यांची दुचाकीसह खिशातील रोकड घेवून पोबारा केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली होती. काही तासातच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिंधी कॉलनीतील लक्ष्मीनगर येथील तन्मय पंकज सोनी हा त्याचा मित्र शिव विजय चौधरी (रा. कोल्हेनगर, पिंप्राळा शिवार) यांच्यासह मेहरूण तलावाकडे फिरण्यासाठी त्याच्या वडिलांच्या दुचाकीने (क्र एमएच 19-बीझेड 3353) गेला होता. यावेळी तिघांनी येथे का थांबले आहात असे विचारून तन्मय व शिव यास दमदाटी करून चापट्या बुक्क्यांनी मारहाण केली होती. एकाने तन्मयच्या खिशातील दुचाकीची चाबी काढून घेत अंगझडती घेतली. तसेच शिव याच्या खिशातील पाचशेची नोट काढली. दुचाकी हिसकावून तलावाच्या दिशेने पसार झाले.

तांबापुर्‍यातील दोन जणांना अटक
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शोध पथकातील अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, अशोक सनकत, विजय पाटील, असीम तडवी, किशोर पाटील, नितीन पाटील यांनी मध्यरात्रीच तपासचके्र फिरवित संशयितांचे नाव निष्पन्न केले होते. त्यानुसार रिजवान शेख ऊर्फ काल्या गयासोद्दीन शेख (रा. तांबापुरा) यास सोमवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या सुमारास तर सुरजितसिंग लेनसिंग टाक (रा. शिरसोली नाका तांबापुरा) याला सोमवारी दुपारी अटक केली. यातील आग्या (पूर्ण नाव गाव माहीत नाही) हा फरार आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.