रावेर। महाराणा प्रताप यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन मुघलांच्या अत्याचाराविरुध्द लढा पुकारला, त्यांनी जाती पाती भेद विसरुन भिल्ल, आदीवासी जमातीचे संघटन करुन सेना उभारली, आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी राजवैभव सोडून रानावनात भटकंती करुन आपले सर्वस्व देशाला समर्पित केले. त्यामुळे आजच्या तरुणाईने देखील महाराणा प्रताप यांच्या कार्यातून प्रेरणा घेत देशासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.नरसिंग परदेशी यांनी केले. महाराणा प्रताप जयंतीनिमित्त रावेरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राजपूत युवा मंचचा उपक्रम
राजपूत युवा मंचतर्फे येथील के.एस.अग्रवाल हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्ताने ’महाराणा प्रताप एक दीपस्तंभ’ या विषयावर व्याख्यान झाले. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे डॉ.नरसिंग परदेशी प्रमुख वक्ते, तर राजधर पाटील अध्यक्षस्थानी, संतोषसिंह परदेशी, एम.आर.चौधरी, दिलीप कांबळे, भास्कर महाजन, कन्हयासिंग परदेशी, भिका राजपूत, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे प्रमुख पाहुणे होते. यानंतर प्रा.डॉ. परदेशी यांनी, महाराणा प्रताप यांनी वेगवेगळ्या धर्मातील योध्यांना सोबत घेत संघर्ष केला. आपल्या पराक्रमाने मोगलांना नेस्तनाबूत करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती. स्वाभिमानामुळेच त्यांनी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केले, असे सांगितले. तसेच चितोडगढ, मेवाड, चावाळ या ठिकाणी भेट देवून राजपुतांचा इतिहास जाणून घ्यावा असे आवाहनदेखील केले. प्रामुख्याने तरुणांनी महाराणा प्रताप यांचा इतिहास वाचावा, अशी सूचना केली. प्रचंड उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमास कल्याणसिंग पाटील, कन्हय्या चौधरी, प्रा.अरूण चौधरी, संदीपसिंह राजपूत, शरद राजपूत, यशपाल परदेशी, चिंतामण पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, युवराज पाटील, शंभूसिंह ठाकूर, शरद चौधरी, रवींद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन डॉ.रणजित पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.