जळगाव। टॉवर चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतुक पोलिसांनी ट्रीपल सीट जात असलेल्या तरूणांना अडवून लायसन्स दाखविण्याचे सांगितले. मात्र, तिघांनी लायसन्स न दाखवता दोन्ही वाहतुक पोलिसांशी वाद घालत धक्काबुक्की केली. याच्यावरच न थांबता बहाद्दरांनी चक्क भर चौकात शिवीगाळ करीत वाहतुक पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. ही प्रकार शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी वाहतुक कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॉवर चौकात असलेल्या पोलिसांनी मागितले कागदपत्रे
टॉवर चौकात शनिवारी सकाळी श्यामकांत लाड आणि भाऊराव ओंकार इंगळे हे शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी ड्युटीवर होते. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाण पुलाकडून दुचाकीवर (क्र. एमएच.19.बीवाय.6652) तिघेजण टॉवर चौकाकडे येत होते. त्यावेळी सिग्नलवर श्यामकांत लाड यांनी त्यांना अडविले. दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडविल्याने त्याचा राग आल्याने त्यांनी आम्हाला का अडविले? असा प्रतिप्रश्न पोलिसांना केला. दुचाकी चालविणार्याकडे पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना तसेच कागदपत्रे मागितले. मात्र त्यांनी उर्मटपणे उत्तरे देत माझ्याकडे काहीच कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यामुळे लाड यांनी त्यांना दंड भरावा लागेल असे सांगितले. त्यावेळी त्यातील एक युवक मोबाइलमध्ये पोलिसांचे शुटींग करीत होता. त्यावेळी इंगळे त्याच्याकडे गेले. त्यांनी त्याचा मोबाइल मागितला असता त्याने इंगळे यांना धक्काबुक्की करून खाली पाडले. त्यानंतर लाड त्या युवकांजवळ गेले. त्यांनाही युवकांनी धक्का बुक्की केली.
तिघांना घेतले ताब्यात
वाहतूक पोलिस कर्मचारी आणि युवकांमध्ये वाद सुरू असताना शहर पोलिस ठाण्याचे गस्तीचे पथक त्या ठिकाणी आले. त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यात स्वप्नील युवराज पाटील (वय 21), कृष्णा युवराज पाटील (वय 19), दीपक प्रकाश पाटील (वय 21) हे सर्व ममुराबाद येथील रहिवासी आहेत. ते फुले मार्केटमध्ये एका इलेक्ट्रीक दुकानावर कामाला आहेत. सकाळी ते कामासाठी जात होते. त्याचवेळी टॉवर चौकात त्यांचा वाद झाला. त्यावेळी या युवकांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच त्यांची मोबाइलमध्ये कोणतीच शुटींग करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.