फैजपूर : ‘सदरक्षणाय खलनिग्रणाह्य’ हे ब्रीद समोर ठेवून पोलीस समाज रक्षणाचे कार्य दिवसरात्र करीत असतो. स्वतःचा आनंद, त्रास आणि कुटूंब बाजुला सारुन दक्षपणे कर्तव्य बजावतो मात्र दुर्दैवाने समाजमनात पोलिसांची प्रतिमा सन्मानापासून काहीशी वंचित राहते. त्यामुळे पोलीस यंत्रणा समजून घेवून पोलिसांची ताकद बनण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी केले. येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात पोलीस स्थापना दिनानिमित्त फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद साधला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी उपस्थित होते.
अभ्यासतंत्र आणि मुलाखत तंत्रावर टाकला प्रकाश
पोलीस मित्र संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. पोलीसी वर्दीतला माणूस सामान्य नागरिकांची कर्तव्ये, गुन्ह्यांची दक्षता, कॅशलेस व्यवहारातील खबरदारी आदी विषयांवर थोरात यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. यासोबतच स्वअनुभवातून स्पर्धा परिक्षा तयारी, अभ्यासतंत्र आणि मुलाखत तंत्र यावर प्रकाश टाकला.
सायबर गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करा
यावेळी थोरात म्हणाले की, मनामनात तेढ निर्माण करण्यापेक्षा सण, उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकता अबाधित राहण्याचा प्रयत्न करा. सायबर गुन्ह्यापासून स्वतःचा बचाव करतांनाच फसव्या फोन कॉल्सना प्रतिसाद न देता सोश मिडीयाचा योग्य तो वापर करा.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. डी.बी. तायडे, उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, डॉ. ए.आय. भंगाळे, उपप्राचार्य प्रा. ए.जी. सरोदे, प्रा.डॉ. एस.व्ही. जाधव, डॉ. ए.के. पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र राजपूत यांनी केले तर यशस्वीतेसाठी शेखर चौधरी, कैलास चंदनशिव, निरज शिरनामे, संदिप चावरे, पंकज निकम, रोहिणी, मोनिका चौधरी, मोनाली सोनवणे, रुपाली माहेश्री यांनी परिश्रम घेतले.