मुक्ताईनगर। देशात भाजपाचे सरकार आल्यानंतर व्होकेशनल एज्युकेशनचे नामकरण करुन स्कील एज्युकेशन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षित युवकाला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्यातरी कुशल कारागिराने नोकरीच्या मागे न लागता स्वयं रोजगारकडे वळावे असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे अप्रेंटीस धारकांना प्रमाणपत्र वाटपाप्रसंगी केले. जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने ग.सु.वराडे आयटीआय येथे शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटीस) पुर्ण केलेल्या उमेदवारांना खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
योजनांद्वारे रोजगार स्थापन करण्याचे आवाहन
यावेळी तरुणांनी केंद्र सरकारच्या विविध रोजगाराभिमुख योजनांचा अभ्यास करुन स्वत:चा रोजगार स्थापन करण्याचे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले. व्यासपीठावर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी.वाघमारे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संचालक विलास धायडे, भुसावळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.आय. तायडे, सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार कोटावदे, ग.सु. वराडे आयटीआयचे प्राचार्य एस.पी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिनिधी स्वरुपात दहा उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक सतीश चौधरी यांनी तर आभार कोटावदे यांनी मानले.