तरुणांसह गावकर्‍यांचे प्रबोधन; भूमिकेचे ग्रामस्थांनी केले स्वागत

0

धुळे : धुळे तालुक्यातील विविध महत्वाच्या गावांमधील लोकसहभागतून बहुतांश गावे दारू आणि गुटखा मुक्त करण्याच्या दिशेने जिल्हा पोलीस दलातील सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही येत आहे. मेहेरगाव, निकुंभे या गावांमध्ये दारूबंदी केली असतांनाच २२ रोजी गुरुवारी नवलाणे गावातही ग्रामपंचायतीचे सरपंच आणि महिला, ग्रामस्थांच्या पुढाकाराने दारूबंदीचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांच्या या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत करुन पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे.

महिलांनी केली होती मागणी
नवलाणे गावातील किशोरवयीन आणि तरुणांमध्ये व्यसनतेचे प्रमाण वाढले आहे. गावात हातभट्ट्या असल्याने तरुण मुले, कष्टकरी व्यक्ती सायंकाळी गावठी दारुंचे सेवन करुन घरात धिंगाणा घालायचे. पुन्हा लहान मुलं, युवक, पुरुषांना गुटख्याचे व्यसनही जडल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यातच तरुणांच्या व्यसनांमुळे त्यांच्या घरातील महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दारु पिऊन महामार्गावरुन वाहनांनी घरी येतांना नवलाणे गावातील १५ ते २० तरुणांचे बळी अपघातामुळे गेले आहेत. अजून १५ पुरुष मृत्यूच्या दाढेत आहेत. गावातील या दारु, गुटख्याच्या व्यसनांमुळे महिला वर्गात प्रचंड असंतोष होता. नवलाणे गावातील काही महिलांनी सोनगीर पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्‍वर वारे यांच्याकडे दारू पिणार्‍यांवर आणि हातभट्ट्यांवर कारवाईची मागणी केली होती.

ग्रामस्थांना करून दिली जाणीव
सपोनि वारे यांनी या समस्येवर तात्पुरता मलमपट्टी न करता मूळासकट ही समस्या उखडून फेकण्याचा चंग बांधला. यासाठी त्यांनी गुन्हे दाखल करुन कारवाई न करता नवलाणे गावातीलच ग्रामपंचायतीचे सरपंच भिमा आणि महिलांना हाताशी धरुन गावात दारुबंदी, गुटखा बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सपोनि वारे यांनी गावात जाऊन गावकर्‍यांची भिलाटी भागात बैठक घेतली. या बैठकीला मोठ्या सभेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी दारु, गुटखा सेवनाने होणार्‍या गंभीर दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. अशा व्यसनांमुळे आपली पिढी, संसार कसा उध्वस्त होत आहे. याची जाणीव ग्रामस्थांना करुन दिली. याबाबत केवळ पोलिसांनी प्रयत्न करुन फायदा नाही. तर गावातील सर्वच लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सपोनि वारे यांनी यावेळी सांगितले.

दारू पाडणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत ग्रामपंचायतीच्या मदतीने व लोकसहभागाने गावात पुर्णपणे दारू, गुटखा बंदी करण्याचा, सर्वच अवैध धंदे उखडून फेकण्याचा दृढ निश्‍चय झाला. यापुढे गावात दारू,गुटखा विक्री होतांना आढळून आले किंवा बाहेर गावाहून दारू पिऊन गावात येणार्‍याला दंडाची तरतूदही करण्यात आली. सभेला गावातील तरुण, महिला यांच्यासह बाराशे ते तेराशे ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच भीमा सुर्यवंशी, पोलीस पाटील नाना बागुल, उपसरपंच नाना श्रावण बागुल, ग्रा.पं.सदस्य कारभारी खंडेकर, उपसरपंच आत्माराम पवार, झिंगा झेंडा बागुल, द्वारकाबाई पद्मर, केवळबाई खताळ, संगीता बागुल, बानुबाई ठाकरे यासह शेकडो महिलांनी आज सकाळी गावातील सर्वच हातभट्ट्या उध्वस्त केल्यात. तसेच दारू पाडणारे व्यावसायिकांसह त्यांच्या कुटुंबांनीही स्वतःहून हातभट्ट्या काढून घेतल्या. इतकेच नव्हे तर दारू भट्ट्या बंद केल्याने दारु पाडणार्‍यांच्या कुटुंबांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरपंच भीमा सुर्यवंशी यांनी त्यांना आर्थिक मदत दिली.