तरुणाचा खून करून पसार होणार्‍या आरोपीस जंक्शनमध्ये कट्ट्यासह अटक

आरोपीच्या ताब्यातून पिस्टलासह 36 जिवंत काडतुसे जप्त : पवन एक्स्प्रेसमधून आवळल्या मुसक्या

Youth shot dead in Vasai taluka : Pawan Express bound the accused in Bhusawal भुसावळ : वसई तालुक्यातील तिल्हेर धुमाळपाडा येथे कमरुद्दीन गियासोद्दीन चौधरी (21, वाखनपाडा, पेल्हार, नालासोपारा पूर्व) या तरुणाची रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तरुणाच्या हत्येनंतर संशयीत आरोपी नईम इक्बाल अब्दुल अहमद (35, पालघर, मुंबई) हा डाऊन पवन एक्स्प्रेसने पसार होत असल्याची माहिती स्थानिक बाजारपेठ व लोहमार्ग पोलिसांना कळवल्यानंतर भुसावळात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता गाडी प्लॅटफार्म क्रमांक पाचवर आल्यानंतर आरोपीला जनरल डब्यातून अटक करण्यात आली.

तरुणाची केली हत्या
तिल्हेर धुमाळपाडा येथील पारोळ-भिवंडी रोडजवळील ठक्करभाई विटभट्टीजवळ कमरुद्दीन गियासोद्दीन चौधरी (21, वाखनपाडा, पेल्हार, नालासोपारा पूर्व) या तरुणाची डोक्यात गोळी झाडून रविवारी हत्या करण्यात आली होती. सुरूवातीला या प्रकरणी पोलिस पाटील रामदास बुरूड (53) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र नंतर तरुणाची ओळख पटल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खून आरोपी नईम इक्बाल अब्दुल अहमद (35, पालघर, मुंबई) याने केल्यानंतर तो रेल्वेमार्गे पसार होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांसह बाजारपेठ पोलिसांना सूचित करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास डाऊन पवन एक्स्प्रेस आल्यानंतर जनरल बोगीतून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, आरोपीच्या बॅगेतून एक पिस्टल व 36 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपीने तरुणाची हत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

यांनी आवळल्या मुसक्या
भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, उपनिरीक्षक संजय साळुंखे, उपनिरीक्षक बबन शिंदे,डीबी कर्मचारी अजित तडवी, सागर खंडारे, जगदीश ठाकूर, बाबू मिर्झा, बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड व कर्मचार्‍यांनी संयुक्तरीत्या कारवाई केली.