चोपडा। बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे चंपावती नदीला आलेल्या पुरात चहार्डी येथील तुषार गुलाबराव न्हावी (वय-27) हा तरूण वाहून गेला. त्याचा मृतदेह सकाळी चहार्डीपासून एक किलोमीटर अंतरावर के.टी.वेअरच्या बाजूला काटेरी झुडपात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दिपक गिरासे घटनास्थळी पोहचले होते. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आई-वडील अनभिज्ञच…
चहार्डी येथील काळकमपूरा भागातील रहिवासी गुलाबराव न्हावी यांचा एकुलता एक मुलगा तुषार 7 जून रोजी रात्री व्यवसाय आटोपून घरी जात होता. चंपावती नदी पार करतांना पुर असल्याने तो वाहून गेला असावा असे बोलले जात आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात एक किलोमीटर अंतरावर के.टी. वेअर बंधार्यात अडकला होता. रात्री वीज पुरवठा बंद असल्याने व पूर आल्याने तुषार दुकानावरच असावा असे त्याच्या आई वडिलांना वाटले. मात्र सकाळी कोल्हापुरी बंधार्यात अडकलेली लाकडे काढायला गेलेल्या इतरांच्या लक्षात ही गोष्ट आली. ग्रामस्थानी बंधार्याकडे धाव घेतली. सकाळी तुषारचा मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रा.नीलम पाटील यांनी तुषारच्या कुटुंबियांचे सांत्वन केले पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे महसूल विभागाकडून मृत तुषारच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांनी सांगितले.