आत्महत्या नव्हे घातपाताचा कुटुंबियांचा आरोप ; रेल्वे लाईनवर आढळला मध्यरात्री मृतदेह
जळगाव- शहरातील शिरसोली-जळगाव रेल्वेलाईनवर मध्यरात्री विनोद सुनील महाजन वय 18 रा. हरीविठ्ठल नगर या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास समोर आला. विनोदने आत्महत्या केली नसून विवाहितेशी प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन त्याचे शरीराचे दोन तुकडे करुन मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिल्याचा आरोप विनोदच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन संशयितांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते.
अशी पटवली पोलिसांनी तरुणाची ओळख
रेल्वे स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांनी शुक्रवारी रात्री 1.55 वाजेपूर्वी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फोन करुन शिरसोली जळगाव रेल्वे लाईनवर खंबा क्रमांक 415/13, 415/15 येथे तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानुसार कर्मचारी अनिल फेगडे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळ गाठले. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तरुणाजवळ आढळून आलेल्या मोबाईलमधील क्रमाकांवर संपर्क साधला असता, तो त्याच्या अकोला येथील मावसआजीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालय गाठले असता, ओळख पटविली असता, तरुण हा हरिविठ्ठल नगरातील विनोद महाजन असल्याचे समोर आले. याप्रकरणी स्टेशन प्रबंधक आर.के.पालरेचा यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायंकाळी घरातून बाहेर पडला, रात्री मृत्यूची बातमी
हरिविठ्ठल नगरात सुनील प्रल्हाद महाजन हे पत्नी रेश्मा व दोन मुले तुषार व विनोद याच्यासह वास्तव्यास आहेत. तुषार हा 12 वीत शिक्षण घेतो. सुनील महाजन हे रंगकाम व्यावसायिक असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह भागतो. या कामात विनोदही त्यांना मदत करत असे. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता जेवणाला येतो, असे विनोदचे त्याचे वडील सुनील महाजन यांच्याशी बोलणे झाले होते. यानंतर त्याचा रेल्वे लाईनवर मृतदेह असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असे विनोदचे वडील सुनील महाजन यांनी बोलतांना सांगितले. ज्या अवस्थेत विनोदचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार विनोदने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली असल्याचा आरोप विनोदच्या वडीलांनी केला.
मित्राला म्हणाला होता, तीन जण मागावर आहेत
- शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विनोदचे त्याचा मित्र अजय सोनवणे याच्याशी बोलणे झाले होते. प्रेमप्रकरण असलेल्या महिलेच पतीसह दोन जण शोध घेत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांचा फोन येत असून मला बोलावित आहेत, तसेच ते माझ्या मागावर असून शोध घेत असल्याचेही त्याने अजयला सांगितले होते. महिलेच्या प्रेमप्रकरणातून विनोदची पतीसह तिघांनी हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
- विनोदकडे दोन मोबाईल होते, त्यापैकी एक मोबाईल गायब असून एकच मोबाईल घटनास्थळावर मिळून आला आहे. जो मोबाईल गायब आहे, त्यात कॉल रेकॉर्डिंग व्हायची. त्यात रेकॉर्डिंगमुळे आपले पकडले जावू म्हणून संशयितांनी मोबाईल चोरुन नेला असल्याचा अंदाजही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करावा व संशयितांना तत्काळ अटक करावी, यासाठी शनिवारी सकाळी पोलीस कुटुंबियांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितल्यावर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती.