तळेगाव दाभाडेः वायरने गळा आवळून तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आढे गावच्या हद्दीत टाकला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. नवनाथ काकासाहेब निहाळ (वय 29), दिलीप उर्फ बळीराम रमेश निहाळ (वय 18, दोघे रा. चणेगाव, जि. जालना), उमेश उर्फ पप्पू दिगंबर राऊत (वय 31, रा. राजूर, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रकाश कोंडीबा निहाळ (वय 25, रा. चणेगाव, सध्या धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गजानन बाबुराव शिंदे (रा. विश्वेश्वर बिल्डिंग, धायरी) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपास करणे गेले अवघड
गुरुवारी (दि. 5) नवनाथ, दिलीप आणि उमेश यांनी प्रकाश याचा वायरसारख्या वस्तूने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आढे गावच्या हद्दीत पुलावरून फेकून दिला. सुरुवातीला आरोपी माहिती नसल्याने या प्रकरणाचा तपास करणे हे तळेगाव पोलिसांसमोर कठीण आव्हान होते. प्रकरणाचा तपास करत तळेगाव पोलीस जालना जिल्ह्यातील प्रकाश याच्या गावात पोहोचले. कसून तपास करत असताना नवनाथ, दिलीप आणि उमेश यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे समोर आले. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.
कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ उलटली
कामशेत – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ कार उलटली. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ (के ए 05 / ए जी 8732) आली असता रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि त्यावर पडलेल्या पावसामुळे कार घसरली. अचानक कार घसरल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला केली. सकाळच्या सुमारास अपघात झाल्याने याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.