तरुणाच्या खून प्रकरणी चौघा मित्रांविरोधात खुनाचा गुन्हा
भुसावळ शहरात खळबळ : चौघा संशयीत युवकांविरोधात लोहमार्ग पोलिसात खुनाचा गुन्हा : संशयीत अमृतसरला पसार
Amritsar youth strangled to death in Bhusawal : Murder Case Against Four Friends भुसावळ : शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (19, रा.2603 अ, गल्ली क्रमांक एक, तहसीलपुरा बसस्थानकाजवळ, अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, खुनानंतर संशयीत अमृतसरला पसार झाले आहेत.
खून करून मृतदेह फेकला
सूत्रांच्या माहितीनुसार, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, 26 रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी- 2 डब्यात पाच तरुणांचा मुलीशी छेडखानीवरून वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डेबीट कार्डवरून पटली ओळख
मृत व्यक्तीजवळ डेबीट कार्ड होते. ते कार्ड पंजाब अॅण्ड सिंद या बॅकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे त्या बॅकेंत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाची विच्छेदन करण्यात आले असून हा मृतदेह त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मारहाण करीत चिरला गळा
खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी दहा वाजेपूर्वी मनमीतसिंग गुरूप्रीतसिंग या प्रवाशाचा मृतदेह सापडला. त्मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी रवाना केला असता विच्छेदनावेळी मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळा सुध्दा चिरल्याचे आढळून आले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र नंतर मयताचा भाऊ डॉ.मनकिरण सिंग यांनी फिर्याद दिल्याने भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात जसवंतसिंग, रामसिंग, बलजितसिंग, पंजाबसिंह (रा.सर्व रा.अमृतसर, पंजाब) या संशयीतांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली सुरू आहे.
अमृतसरला जावून आवळणार मुसक्या
तरुणाच्या खून प्रकरणी मयताच्या चारही मित्रांवर संशय व्यक्त करण्यात आला असून चारही संशयीत अमृतसर येथील असल्याने त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लोहमार्ग पोलिसांचे विशेष पथक संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी लवकरच अमृतसर येथे जाणार असल्याचे निरीक्षक घेर्डे म्हणाले.