तरुणाला टोळक्याकडून मारहाण

0

सांगवी : रस्त्यावर मित्रासोबत गप्पा मारत उभा असलेल्या तरुणाला नऊ जणांच्या टोळक्याने तलवार व कोयत्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी पिंपळे निलख येथे घडली. अनिकेत संतोष दोडके (वय 19, रा. पिंपळे निलख गावठाण) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विष्णू रोडगे, रोहित मानमोडे, विजय पिल्ले, ऋतिक पांचाळ, आकाश कांबळे, बाळू (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि अन्य तीन जण असा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोडके शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हरी ओम दूध डेअरी समोर पिंपळे निलख येथे त्यांचा मित्र सुशांत साठे यांच्यासोबत बोलत थांबले होते. त्यावेळी दोडके यांच्या तोंडओळखीचे सर्वजण तिथे आले. ‘तुम्ही रोडमध्ये उभे आहेत, तुमचे काय नाटकी हेत, तुम्हाला लय माज आलाय. तुमचा माज उतरवणार’ असे म्हणत सर्वानी मिळून लाथा बुक्क्या, तलवार व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये दोडके गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.