मुंबई : अनेक महिलांसह तरुणींचा विनयभंग करणार्या जिबरान शफी सय्यदला (28) गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्यानी अटक केली. त्याच्या अटकेने विनयभंगाच्या अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असून, अटकेनंतर त्याला खार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद खार आणि वांद्रे पोलीस ठाण्यात असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून एकजण दुचाकीवरून येऊन वांद्रे, पाली हिल, रिझवी कॉलेज, माऊंटमेरी, बॅण्डस्टॅण्ड या उच्चभू परिसरात मॉर्निंगवॉक आणि महाविद्यालयात जाणार्या महिलांसह तरुणींशी अश्लील वर्तन करून पळून जात असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्याना संबंधित आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते.