चौकशीनंतर धुळे कारागृहात पुन्हा रवानगी
धुळे । तालुक्यातील सोनगीर येथे मध्यप्रदेशातुन कामानिमित्त आलेल्या तरुणीला राजस्थान फिरविण्याचे आमिष दाखवुन तीची विक्री केल्याप्रकरणी संशयित दोघा आरोपींची राजस्थान पोलिसांनी चौकशी केली. त्यासाठी पुर्वपरवानगीने या दोघांना राजस्थान पोलिसांनी त्यांच्या सोबत नेले होते. चौकशीनंतर त्यांना पुन्हा धुळे कारागृह पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील बडवानी येथील मुळ रहिवासी असलेली एक २८ वर्षीय आदिवासी तरूणी कामानिमित्त सोनगीर येथे स्थायिक झाली होती. डिसेंबर २०१६ च्या दरम्यान तीला सोनगीर येथील गोरख भिका माळी, मंगला ईश्वर माळी, मोहनसिंग ऊर्फ भैय्या भील या तिघांनी राजस्थान फिरविण्याचे निमित्ताने घेऊन गेले होते. राजस्थानातील अमरसागर व जैसलमेर येथे फिरवून तेथीलच दिनेश माळी याच्या मदतीने या तरुणीला अमरसागर येथील हिरा माळी यास विकले होते. हिरा माळीशी बळजबरीने या तरूणीचा विवाह लावून देण्यात आला होता. तर पैसे देवून विकत घेतल्याचे सांगत हिरा माळी सातत्याने या तरूणीवर अत्याचार करीत होता.
रात्री काढली पळ
सोनगीरमध्ये तरूणीच्या वडीलांनी गोरख माळी व मोहनसिंग भील यांना अनेकवेळा मुलीविषयी विचारणा केली. मात्र ते उडवा-उडवीचे उत्तरे देत होते. पिडीत तरूणीही आपल्या वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होती मात्र संपर्क होत नव्हता. अखेरीस हिरा माळीच्या अत्याचारास वैतागून बाहेर गावी गेल्याची संधी साधून या तरुणीला निसटण्यात यश आले. रात्री तीने जंगलमार्गे जैसलमेर गाठले व तेथील पोलिसांच्या मदतीने वडिलांशी संपर्क साधला व वडिलांना आपबितीही सांगितली.
पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तपास पथक तयार करून ते राजस्थान येथील जैसलमेर येथे पाठविले. तेथुन दोघांना ताब्यात घेवुन तरुणीची सुटका केली. चौकशी करतांना सोनगीरातील गोरख माळी, मंगला माळी व भैय्या भील यांची नावे सांगितले. संशयीत महिला मंगला माळी हिने २२ एप्रिल रोजीच आत्महत्या केली होती.