चाळीसगाव । शहरातील शिव कॉलनीतील राहत्या घरात महाविद्यालयीन तरुणीचा 3 रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली असून लवकरच खुनाचा उलगडा होऊन आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी दिली आहे. तरुणीच्या संबंधीत असलेल्यांकडून खुन झाल्याची चर्चा शहरात आहे. याबाबत पोलीसांनी शोध मोहिम सुरु केली आहे.
सदर तज्ञ हे आरोपी शोधण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे बारकाईने काम करीत असून तसे त्यांनी नमुने घेतले आहेत. पोलीस निरीक्षक यांनी महिला अधिकार्यांसह घटना स्थळाची आज देखील पाहणी केली असून ते जागेवरून काही नमुने घेत ते नाशिक फॉरेन्सिक लॅबला पाठवणार असल्याचे व लवकरच आरोपीला जेरबंद करणार असल्याची माहिती शहर पो.नि.रामेश्वर गाडे पाटील यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना दिली आहे.
शहरातील शिव कॉलनीतील घरात 3 जुलै 2017 रोजी रात्री 8:30 ते 11:30 वाजेच्या दरम्यान विज्ञानच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणारी 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी सायली अनिल पाटील हीच अज्ञात मारेकर्याने डोक्यात तीक्ष्ण हत्यार मारून निर्घृण खून केला होता. त्यामुळे शहरात एकाच खळबळ उडून पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे वेगवान फिरवली आहेत. 4 जुलै रोजी जळगाव येथील अंगोली मुद्रा पथक व श्वान पथकाला पाचारण करूनही काही उपयोग झाला नाही. बुधवार 5 जुलै 2017 रोजी धुळे येथील फॉरेन्सिक लॅब पोलीस अधीक्षक कार्यालय धुळेचे न्याय वैज्ञानिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून त्यांनी देखील घटना स्थळाचे निरीक्षण करून रक्ताचे नमुने घेतले आहेत.