तरुणीच्या हाताची चार बोटे तुटली

0

निगडी : औद्योगिक वसाहतीतील कंपनीत काम करत असताना 18 दिवसांपूर्वी डाय मशिनचा लोखंडी भाग हातावर पडल्याने तरुणीच्या दोन्ही हाताची चार बोटे तुटली आहेत. याप्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जुलै रोजी तळवडे, सोनवणे वस्ती येथील एका कंपनीत ही घटना घडली. याप्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत कारोलय, सुपरवायझर एजाज शेख आणि मशीन ऑपरेटर अरूण रॉय यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मसरीन नंदा दमायी (वय 17, रा. चिखली, मूळगाव पश्चिम बंगाल) हिने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कामाचा अनुभव नव्हता
मसरीन ही चिखली येथील एका औद्योगिक कंपनीत नोकरी करत होती. तिला प्रेस मशिनवर काम करण्याचा अनुभव नव्हता. तरीही, सुपरवायझर एजाज शेख याने कंपनीचे मालक श्रीकांत कारोलय यांच्या सांगण्यावरून मसरीनला 3 जुलै रोजी प्रेस मशिनवर काम करायला लावले. मसरीन प्रेस मशिनवर तयार झालेला जॉब काढत होती. त्यावेळी मसरिन जॉब काढत असल्याचे माहिती असतानाही मशीन ऑपरेटर अरूण रॉय याने प्रेस मशिनचा पॅडल हयगयीने मारला. त्यामुळे मशिनचा लोखंडी भाग मसरिनच्या हातावर आदळल्याने तिच्या दोन्ही हाताची चार बोटे तुटली आहेत, असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी ठाण्याचे फौजदार एस. वाय. होळकर तपास करत आहेत.