भजी-पकोडा विकण्याचा सल्ला देणारांकडून तरूणांची थट्टा
‘जॉब फेअर’मध्ये पाच हजार युवकांची ऑनलाईन नोंदणी
पिंपरी चिंचवड : आता बुध्दीमत्तेच्या जोरावरच रोजगार मिळू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. तसेच तरुण पिढीने राजकारण, समाजकारणाकडे वळले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत देशातील तरुणाला बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत असताना प्रधानसेवक भजी-पकोडा विकण्याचा सल्ला देतात. ही बेरोजगार तरूणांची क्रुर थट्टा आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून युवक, महिला, सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून येत्या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेऊन भाजपाला घरी बसवेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विविध क्षेत्रातील 116 कंपन्यांचा सहभाग…
नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, नगरसेविका शितल काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, युवा नेते पार्थ अजित पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव डॉ. संदीप कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, मनपा विरोधी पक्षनेता दत्ता साने, घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, शाम लांडे, सुनिल गव्हाणे, माई काटे, उषा काळे आदी उपस्थित होते. जॉब फेअरमध्ये माहिती तंत्रज्ञान ते औद्योगिक उत्पादन करणार्या विविध क्षेत्रातील 116 कंपन्या सहभागी झाल्या. तर पाच हजार युवकांनी ऑनलाईन नोंदणी केली. मेळाव्यास युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘प्रतिबिंब’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हे देखील वाचा
संधीचा योग्य वापर करा…
युवकांना सल्ला देताना पवार म्हणाले, बेरोजगारांनी नाऊमेद न होता नैराश्यातून व्यसनाधीन होऊ नये. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संयम बाळगावा. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात. इच्छा शक्तीच्या जोरावर आणि आलेल्या संधीचा योग्य वापर करून यश सहज प्राप्त करता येते. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये रिक्त जागांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये 500 जागा रिक्त असून रयत शिक्षण संस्थेत 2500 पदे रिक्त आहेत. सरकारने याबाबत धोरण निश्चित करून गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
संविधान बदलण्याची भाषा…
सरकार काही तरी करेल ही अपेक्षा न बाळगता आम्ही विरोधात असूनही समाजातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी जी मदत करता येईल या उद्देशाने नाना काटे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पवार यांनी कौतुक करून अशाच प्रकारचे प्रयत्न येथून पुढे ही केले जातील. येत्या काळात लोकसभा, विधानसेभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यक्रम, योजनांची घोषणा सत्ताधारी करत आहेत. मात्र, काय योग्य अयोग्य याचा विचार नागरिकांनी करावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याची भाषा सध्या केली जात आहे.
प्रतिगामी विचारांच्या व्यक्तींची किव येते…
अजित पवार म्हणाले की, 21 व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्त्रो जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्ती ‘आंबा खाण्याचा’ सल्ला देते. अशा बुध्दीवंतांची किव येते, असे म्हणत भिडे गुरुजींवर नाव न घेता टीका केली. आपण भारतीय असून संविधान बदलण्याचा प्रयत्न करणार्यांना योग्य धडा शिकवला पाहिजे. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रोजगार मिळालेल्या उमेदवारांनी आपले काम योग्य, बिनचुक, कर्तव्य तत्पर राहून करावे. तुमच्या कष्टावरच पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र आणि देशाचे पुढील भवितव्य अवलंबून आहे, असे पवार म्हणाले. सुत्रसंचालन प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्रास्ताविक विठ्ठल (नाना) काटे, आभार शितल (नाना) काटे यांनी मानले.