‘चाहूल चांदण्यांची’ या मराठी गझलांच्या सीडीचे प्रकाशन
पुणे । कला क्षेत्रातील साधकांनी तंत्रज्ञानाचा सहाय्यक म्हणून आधार घेण्यास हरकत नाही, परंतु तंत्रज्ञानाचा ते केवळ आधार न घेता ते त्याच्या आहारी गेलेले दिसतात. त्यांच्या या वृत्तीमुळेच कलाक्षेत्रातील तरुणपिढी रियाझाला महत्त्व न देता आळशी झालेली दिसून येते, अशी खंत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
स्वरानंद प्रतिष्ठाननिर्मित ‘चाहूल चांदण्यांची’ या मराठी गझलांच्या सीडीचे प्रकाशन देवकी पंडित आणि लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी हिमांशु कुलकर्णी, प्रकाश भोंडे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्की म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या आहारी ही नवीन पिढी गेल्यामुळे गातांना नवीन काही रचना सापडते का याचा शोधच थांबून गेला आहे. माझा व्यक्तिश: अनुभव असा आहे की मी कोणतीही जिंगल्स करताना त्याच्यात शेवटच्या क्षणापर्यंत किमान 3 वेळा कम्पोझिशन करीत असतो. तरुणपिढीमध्ये ही धडपड, तळमळ अभावानेच दिसून येते.
अभिजात संगीताची अभिव्यक्ती
पंडित म्हणाल्या, नाविन्यपूर्ण लेखनासाठी प्रेरणा आवश्यक असते. गझलांमध्ये लपलेल्या अर्थाचा आवाका मोठा असल्याने एकच गझल तुम्ही तीन ते वीस मिनिटांपर्यंत गाऊ शकतात, सादर करू शकतात. गझल म्हणजे अभिजात संगीताची अभिव्यक्ती आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भोंडे यांनी केले, तर प्रा.अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले. वंदना खांडेकर यांनी आभार मानले.
तेच संगीत मनाला भिडणारे
गोडबोले म्हणाले, मी संगीताचा रसिक आहे. मी त्याच्या तंत्रात न अडकता जे संगीत ऐकायला गोड वाटते. तेच संगीत मनाला भिडणारे असते. केवळ हिंदी आणि उर्दू भाषेतच आपण गझल चांगल्या प्रकारे सादर करू शकतो हा समज आज प्रकाशित झालेल्या ध्वनिमुद्रिकेने खोडून काढला आहे.