तरुण बांधकाम व्यावसायिकाची हत्या

0

कल्याणमधील घटना, परिसरात खळबळ, दोन जणांना अटक

ठाणे  । कल्याण पूर्वेतील एका बारसमोर किरकोळ वादातून एका बांधकाम व्यावसायिकाची बार बाहेर निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमचंद गजरे (वय-३५ वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मीबाग परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रेमचंद गजरे हे त्यांचे मित्र गौरव भोसले यांच्यासमवेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरील एका बारमध्ये गेले होते.

यावेळी बारमधून बाहेर पडत असताना त्यांचा एका टेबलाला धक्का लागला. त्यामुळे टेबलवरील दारूने भरलेले ग्लास खाली पडले. यावरुन टेबलवर बसलेल्या पाच जणांनी गजरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

बारमधील भांडणाचा राग
बारमधील भांडणाचा राग मनात धरुन त्या टोळक्याने प्रेमचंद गजरे बारमधून बाहेर पडत असताना त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या मारहाणीत गजरे यांचा मृत्यू झाला आहे, तर या घटनेत गौरव भोसले गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गौरव भोसले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जयेश पाटील, भावेश पाटील, अक्षय तिरोडकर, विशाल जेडे आणि त्यांच्या एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.