मुरूड जंजिरा । राज्यातील जनतेस विकासाचा मार्ग दाखवत अशक्य ते शक्य करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. राज्यातील सुज्ञ, सुजाण व सुसंस्कृत मतदार आज आपल्या सोबत आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील आपलाच उमेदवार विजयी ठरणार, असे प्रतिपादन अदिती तटकरे यांनी श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाच्या जाहीर सभेत केले. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत कागदी संख्येला न जुमानता वास्तविकतेची कास पकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी करण्यात यशस्वी झालो. आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीस आपण सामोरे जात आहोत. नजिम मुल्ला हे शरद पवार साहेबांनी दिलेले उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी आपण सर्व जण कटिबद्ध आहोत. गतकालीन वर्षात सत्ताधारी पक्षाने खोटी आश्वासने देऊन तरुण वर्ग त्यांच्याकडे फिरवण्यात यश प्राप्त केले. परंतु, आज देशातील तरुणांना वास्तविकतेची जाणीव झाली असून केंद्रातील सत्ताधारी वर्गाची खरी ओळख झाली आहे. त्यामुळे आगामी कोकण पदवीधर मतदारसंघात आपल्या उमेदवाराचा विजय ठरलेला आहे.
जनतेच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदैव विकासाला प्राधान्य दिले. जनतेच्या प्रत्येक अडीअडचणीला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज श्रीवर्धन मतदारसंघात आपण सर्वजण जोमाने काम करत आहात. त्यामुळे आपला विजय निश्चितच शक्य आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक पदवीधारक मतदारासाठी शाश्वत उपाययोजना आपण करणार आहोत. आपण घेतलेल्या शिक्षणाचा योग्य आदर राखत भावी काळाच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जातील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. आपले सर्व मित्र पक्ष अतिशय कष्ट घेत आहेत व आपण सर्वांनी आगामी काळात सजग राहत आपले कर्तव्य पार पाडून सुनील तटकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे, असे अदिती तटकरे यांनी कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतात म्हटले.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रचार सभा आज श्रीवर्धन येथील माळी समाज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, अली कौचाली यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नाझीम हासवरे, अविनाश कोळंबेकर, नगरसेवक डॉ. अबू राऊत, शाबीस्ता सरखोत, गणेश पोलेकर, राजेंद्र भोसले मोहिनी वैद्य आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.