तरूणांच्या टोळक्याकडून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

0

जळगाव । खानदेश कॉम्प्लेक्सकडून येणार्‍या दुचाकीचा रेल्वेस्थानकाकडून येणार्‍या रिक्षाला कट लागला. याचा रिक्षाचालकाने कट मारल्याचा जाब विचारला. मात्र, प्रवाश्यांना सोडायचे असल्याने रिक्षाचालक तेथून निघून गेला. प्रवासी सोडून पुन्हा रेल्वेस्थानकाकडे येत असतांना रिक्षाचालकाला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अडवून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास नेहरू चौकात घडली. दरम्यान, रिक्षाचालकाला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष इस्माईल शहा गुलाब शहा (वय 35) हे मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या रिक्षाने (क्र. एमएच-19-व्ही-8367) प्रवासी सोडण्यासाठी रेल्वे स्थानकाकडून बसस्थानकाकडे जात होते. त्याचवेळी नेहरू चौकात खानदेश कॉम्प्लेक्स कडून दुचाकीवर भरधाव वेगाने दोन युवक येत होते. त्यांच्या दुचाकीचा कट शहा यांच्या रिक्षाला लागला. कट मारल्याचा जाब विचारण्यासाठी शहा यांनी रिक्षा उभी केली. त्यावेळी तरूणांनी त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. मात्र प्रवाशांना सोडायचे असल्याने ते रिक्षा घेऊन बसस्थानकाकडे निघून गेले. काही वेळानंतर प्रवासी सोडून शहा रिक्षा घेऊन पुन्हा रेल्वेस्थानकाकडे येत होते. त्यावेळी नेहरू चौकात 10 ते 15 तरूणांनी त्यांची रिक्षा आडवली. काही वेळापुर्वी वाद घालणारे युवकही त्यात होते.

रिक्षा आडवून त्या तरूणांनी शहा यांना काहीही न विचारता मारहाण करण्यात सुुरूवात केली. रस्त्यावर पडलेल्या फरशीने तसेच लोखंडी पाइपने शहा यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी रेल्वे स्थानकावरील रिक्षा चालकांना मारहाणीची माहिती दिली. रिक्षा चालकांनी नेहरू पुतळ्याकडे धाव घेतली. रिक्षा चालक येत असल्याचे बघून तरूणांनी घटनास्थळावरून पोबारा केला. त्यानंतर जमिनीवर निपचीत पडलेल्या शहा यांना रिक्षा चालकांनी तत्काळ उचलून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. बुधवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास शहा शुद्धीवर आले. मारहाण करणार्‍यांनी शहा यांच्या खिशातून 2 हजार 600 रुपये हिसकावल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.