जळगाव । तंत्रज्ञानामुळे जगात प्रचंड वेगाने बदल घडत असून त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी प्राप्त होणार आहे. या संधीचा तरुणांनी फायदा घ्यावा आणि जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन अमेरिकेतील प्रख्यात नवोपक्रमशील आणि उच्च तंत्रज्ञानाभिमुख उद्योजक डॉ.अशोक जोशी यांनी केले. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 26 वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार,दि. 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना डॉ.अशोक जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.एस.टी.इंगळे, प्राचार्य डी.एस.सुर्यवंशी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, डॉ.सुभाष चौधरी, विवेक लोहार, दीपक पाटील, डॉ.प्रशांत कोडगिरे, कुलसचिव भ.भा.पाटील, डॉ.केशव तुपे , डॉ.बी.डी.कर्हाड उपस्थित होते. या समारंभासाठी सुरेखा अशोक जोशी, संतोष मेकल, सरोज मेकल, गोपी मयुर, संध्या मयुर तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळ आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या वादळात रोजगाराची मोठी संधी – डॉ.जोशी
डॉ. जोशी म्हणाले की, जगात गरीबी कमी होत आहे, माणसाचे आयुर्मान वाढले आहे, जीडीपी वाढला आहे, नौसर्गिक आपत्तीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. वीज सर्वत्र उपलब्ध होत आहे. सौरऊर्जेची किंमत कमी होत आहे. शेतीतील तंत्रज्ञान वाढले आहे. हे सगळे बदल केवळ तंत्रज्ञानामुळेच होत असून पुढील दहा वर्षात आपला मोबाईल दहा लाख पटीने शक्तीमान होईल. चालकाविना गाडी चालेले. गतीमान संगणक येत आहेत. रोबोटने माणसाची जागा घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या या घोंघावणार्या वादळांत रोजगाराची खूप मोठी संधी आहे. आठ कंपन्या स्थापन करणार्या डॉ.जोशी यांनी आपले अनुभव कथन केले.
यादीतील 84 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके
यावेळी गुणवत्ता यादीतील 84 विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले.
मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन
यशाची किल्ली सांगताना ते म्हणाले की, सोबत काम करणार्या सहकार्यांना नेहमीच प्रोत्साहन द्यायला हवे. निर्णय क्षमता हवी. भाविनक होऊन निर्णय न घेता तटस्थपणे निर्णय घ्यायला शिका. आपण कोणालाही सतत आनंदी ठेवू शकत नाही. यश हे आपल्यापूरतेच मर्यादित असते. हे लक्षात घ्या. श्रध्दा, कुटुंब, समाज आणि काम या चार गोष्टींवर सातत्याने भर द्या. जात आणि धर्म या पलिकडे जावून जागतिक नागरिक व्हा, असे सांगताना डॉ.जोशी यांनी आपल्या वाटेत अनेक अपमान येतील ते झेलण्याची मनाची तयारी ठेवा. अहंकाराचा स्पर्श होऊ देवू नका. विचारांनी समृध्द व्हा. वेळेचा अपव्यय करु का. जगातिक स्पर्धेचा ध्यास असायला हवा त्यातून संधी मिळतील. इतिहासावर फार अवलंबून राहू नका अशा काही टिप्स् स्नातकांना दिल्या.
विद्यापीठ गिताने कार्यक्रमास सुरूवात
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. दीक्षांत मिरवणूकीने सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणूकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव शरद जोशी होते. दीक्षांत मिरवणूकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते. प्रारंभी विद्यापीठ गीताने सुरूवात झाली. प्रा.संजय पत्की व सहकार्यांनी गीत सादर केले.
यांची प्रमुख उपस्थिती
अधिष्ठातांमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डी.आर.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य पी.पी.छाजेड, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य बी.एन.पाटील आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य श्रीमती एल.एस.मोरे यांचा समावेश होता.
नेतृत्वगुणांबाबत स्नातकांशी साधला संवाद
डॉ.जोशी यांनी यावेळी त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे कथन करतांना आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने उद्योजकीय नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेल्या नेतृत्व गुणांबाबत स्नातकांशी सविस्तर संवाद साधला. अमेरिकेतील केरामाटक या टेक्नॉलॉजी कंपनीचे अध्यक्ष असलेले डॉ.जोशी यांनी त्यांना सहा टेक्नॉलॉजी कंपन्यांची स्थापना करतांना आलेल्या अडचणी त्यातून काढलेला मार्ग याबाबत माहिती सांगितली.
35,164 स्नातकांना पदव्या बहाल
या पदवीप्रदान समारंभात 35 हजार 164 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 11 हजार 925 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 3 हजार 325 स्नातक, मानव्य विद्याशाखेचे 5 हजार 242 आणि आंतर विद्याशाखेचे 663 स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील 84 विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी 21 हजार 155 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 222 पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत. यावेळी जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.