तरूणाचा मृतदेह सापडला तब्बल २४ तासांनी

0

भुशी धरणात पर्यटकाचा बुडून मृत्यू

लोणावळा : लोणावळा, खंडाळ्यात पर्यटन आणि वर्षाविहारासाठी मित्रांसोबत आलेल्या एक युवा पर्यटकाचा लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. तब्बल २४ तासाच्या शोध मोहिमेनंतर या युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. काल गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. सुरेंद्र तुकाराम कदम असे या युवकाचे नाव असून तो दिव्यातील रहिवासी होता. सुरेंद्र आणि इतर तीन मित्र लोणावळा-खंडाळा येथे वर्षाविहार व पर्यटनासाठी आला होते.

ते सर्व गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान भुशीडॅम येथे फिरायला गेले होते. यावेळी ते धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना सुरेंद्र हा मित्रांना बराच वेळ दिसला नाही म्हणून मित्रांनी त्याचा शोध घेण्यास घेण्यास सुरुवात केली. मात्र कोठेही आढळून न आल्याने मदतीसाठी आरडा-ओरड केली. भुशीडॅम जवळ असलेले व्यावसायिक व जीवरक्षक साहेबराव चव्हाण, राजू पवार यांनी घटनास्थळी धावघेत पाण्यात उडी मारून सुरेंद्रचा शोध घेतला. मात्र तो नक्की कोठे बुडाला याचा अंदाज नसल्याने शोध घेणे अवघड गेले. काल रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह मिळाला नव्हता.

अखेर आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्थानिक जीवरक्षक आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाच्या मदतीने सुरेंद्र याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या पथकात साहेबराव चव्हाण, राजु पवार, राजेश तेले, आनंद गावडे, सागर कुंभार, अजय शेलार, प्रणय अंभोरे, प्रविण देशमुख,वैष्णवी भांगरे, अभीजीत बोरकर, राहुल देशमुख, विकास मावकर, अनिल आंद्रे, राजु पाटील, अनिकेत आंबेकर, दिनेश पवार, अतुल लाड, मधूर मुंगसे, प्रविण ढोकळे, अशोक उंबरे, अमोल परचंड, सागर पडवळ, निकीत तेलंगे, रोहीत वर्तक, सुनिल गायकवाड यांचा सहभाग होता.