जळगाव। गेंदालालमिल परिसरातील तरूणाने रविवारी दुपारी 4 ते 6 वाजे दरम्यान राहत्या घरात छताला दोरीने गळफास घेतला. त्याला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपतकालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकूरे यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वैद्यकिय अधिकार्याच्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई-वडील गेले होते वडगावला…
अनिल ज्ञानेश्वर शिंदे (वय 25) हा त्याच्या आई वडीलांसोबत गेंदालालमिल परिसरात राहत होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर शिंदे यांचे गुळवे हायस्कूलजवळ चहाची टपरी आहे. त्या ठिकाणी दोन्ही बाप-लेक काम करीत होते. रविवारी अनिलचे आई, वडील जामनेर तालुक्यातील वडगाव येथे गेले होते. त्यांच्या जावयाचा अपघात झाल्याने त्यांना बघण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे अनिल हा घरी एकटाच होता. त्याचा मोठा भाऊ अजय हा त्याच्या पत्नीसह वेगळा राहतो. रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अनिलने पाणी भरले. त्यानंतर आजुबाजुच्यांशी बोलून तो घरात गेला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याचे आई, वडील घरी परत आले. तर अनिलने घरात छताला दोरीने गळफास घेतलेला दिसला. त्यांनी आरडा ओरड केली. त्यामुळे शेजार्यांनी धाव घेतली. त्याला तत्काळ खाली उतरविले. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यास सांगितले. सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास अनिल याला सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी आपतकालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरकूरे यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.