जळगाव। हातातील मोबाईल कानाला लावून रस्त्याने मित्रासोबत चालत असलेल्या तरूणाच्या हातातून मागावुन दुचाकीवर आलेल्या दोन संशयीतानी हिसकवुन पोबारा केल्याची घटना 10 ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी गुरूवारी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश रामरतन बाविस्कर (28) यांच्यासह पत्नी कविता, बहिण शोभा, आई प्रमिला असे कुटुंब तुकारामवाडीत वास्तव्यास आहे. दिनेश बाविस्कर हे संत गोधडीवाला मार्केटमध्ये निखील गारमेंटमध्ये सुमारे आठ महिन्यांपासून कामास आहेत. दिनेश यांचा मित्र वैभव अनिल मराठे हादेखील याच मार्केटमध्ये कामाला लागला असल्याने दोघे जण घरून बरोबर येत जात असतात. 10 ऑगस्ट 17 रोजी रात्री काम आटोपून दिनेश व वैभव असे दोघे जण पायीच तुकारामवाडीकडे जात होते. मित्राला फोन करावयाचा असल्याने दिनेश यानी वैभवजवळील सॅमसंग मोबाईल हातात घेतला.
जिल्हापेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद
जोक्रमांक डायल करून मोबाईल कानाला लावून ते गप्पा करत चालत असताना अचानक मागून दुचाकीवर दोन जण आले. दुचाकीवरील मागच्या तरूणाने दिनेश यांच्या हातातील मोबाईल हिसकविल्यानंतर दुचाकी सुसाट वेगाने निघुन गेली. ही घटना रात्री 08.20 ते 08.45 वाजता सिव्हील हॉस्पिटलला लागून असलेल्या रस्त्यावर घडली. हा प्रकार घडताच दोघा मित्रांनी आरडाओरड केली, मात्र तोवर चोरटे पसार झाले. सुमारे 17 हजार 900 रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याप्रकरणी आज दिनेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड हे करीत आहेत.