तरूणाला मारहाण करून रेल्वेतून खाली फेकले

0

जळगाव । भागलपुर एक्सप्रेसमधून बर्‍हाणपुर येथून जळगावला येत असलेल्या तरूणाला जळगाव रेल्वे स्टेशनच्या अलीकडेच काही युवकांनी तरूणाला मारहाण करीत धावत्या रेल्वेतून फेकून दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. तरूणाला त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून साबीर शेख जुम्मा (वय-20) असे जखमी तरूणाचे नाव आहे.

साबीर हा बर्‍हाणपुर येथील लालबाग येथे कुटूंबियांसोबत राहतो. तो नेहमी जळगावात राहत असलेले काका शेख रहेमान शेख वसूल यांच्याकडे येत असतो. त्यामुळे मंगळवारी काका शेख रहेमान यांच्याकडे येण्यासाठी सकाळी साबीर हा बर्‍हाणपुर येथून जळगावसाठी भागलपूर एक्सप्रेसमध्ये बसला. यानंतर भुसावळमध्ये आल्यानंतर जागेच्या वादावरून काही तरूणांनी त्याला मारहाण केली. यानंतर जळगाव येईपर्यंत साबीर याच्याशी भांडण करत त्याला मारहाण करत होते. दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास रेल्वे जळगाव रेल्वेस्टेशनजवळ आल्यानंतर हळु झाल्यावर त्या युवकांनी साबीर याला मारहाण करीत रेल्वेतून फेकून दिले. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा होवून त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होवून लागला. रक्तबंबाळ अवस्थेत साबीर हा रेल्वे स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या रिक्षांकडे आला व खंडेराव नगर येथे घेवून जाण्याचे सांगितले. यावेळी रिक्षाचालकाने त्याला लागलीच ओळखल्यानंतर खंडेरावनगर येथे काका शेख रहेमान यांच्याकडे घेवून गेले. यानंतर शेख रहेमान यांनी दुपारी 2.30 वाजता साबीर याला पुन्हा रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेवून उपचारार्थ दाखल केले. साबीर याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो बेशुध्द पडला होता.

दोघांचे विषप्राशन जळगाव। वेगवेगळ्या घटनेत दोन जणांनी विष प्राशन केल्याची घटना मंगळवारी घडली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. रामलाल विक्रम पाटील वय-45 रा. पहाण व नरेश संजीव माळी वय-18 रा. विखरण यांनी विषप्राशन केले असून त्यांना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.