नंदुरबार। शहरातील साक्री नाका परिसरात राहणारा पंकज चौधरी या तरुणाला पोलिसांच्या अहवालानुसार प्रशासनाने स्थानबद्ध करून नाशिक कारागृहात पाठविण्यात आले आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी हिंदू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. हा मोर्चा अचानक पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात घुसल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शहरातील गुन्हेगारांवर ठोस कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत 24 जणांना हद्दपारची नोटीस बजावण्यात आली आहे. तर पंकज चौधरी या तरुणाला स्थानबद्ध करून कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे 14 गुन्हे दाखल आहेत. मात्र ही कारवाई उचित नसल्याचे मत काही तरुणांच्या मनात आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप हिंदू तरुण करू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार 8 ऑगस्टरोजी हा मोर्चा काढण्यात आला.
पोलीसांची उडाली तारांबळ : या मोर्चात डॉ. कांतीलाल टाटीया, अर्जुन मराठे,देवेंद्र जैन,केतन परदेशी, यांच्यासह शेकडो तरुण सहभागी झाले होते. रस्त्यांवर पोलिस अधीक्षक कार्यालय लागते,त्यामुळे हा मोर्चा अचानक पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात घुसला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. तेथे ठिय्या मांडण्यात आला. ही कारवाई योग्य नसल्याचा आरोप मोर्चेकर्यांनी केला. त्यावर पोलिस अधीक्षक डॉ, राजेंद्र डहाळे यांनी कायद्यानुसार कारवाई झाली आहे. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर कोर्टात जाऊ शकतात,असे सांगितले. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला.