जळगाव । शहरातील शाहुनगरात खोली घेवून राहणार्या तरूणाच्या खोलीतून आणि भारतनगरातील तरूणीने खिडकीत ठेवलेला मोबाईल लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. भारतनगर परिसरात राहणार्या नाजनीन रईस शेख या बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घराच्या आवारात मोबाईलवर बोलत होत्या. बोलणे झाल्यानंतर मोबाईल खिडकीत ठेवून त्या अंघोळीसाठी गेल्या. 10 मिनीटात बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिले असता मोबाईल आढळून आला नाही. बाहेर येवून विचारणा केली असता, कुणीतरी इसम घरात घुसला होता असे शेजारच्यांनी सांगितले. परिसरात शोध घेतला असता तो व्यक्ती मिळून आला नाही. नाजनीन शेख यांनी फिर्याद दिल्याने 9 हजार 500 रूपयांचा मोबाईल चोरी केल्याचा गुन्हा शहर पोलिसात दाखल करण्यात आला असून तपास हवालदार बडगुजर करीत आहे.
विद्यार्थ्याचा मोबाईल लंपास
शहरातील एका क्लासेसमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेला विद्यार्थी धनंजय गरूड जरीले हा शाहुनगरात खोली करून मित्रांसोबत राहतो. बुधवारी दुपारी दोघे मित्र बाहेर गेलेले असताना धनंजय हा गच्चीवर कपडे धुवत होता. 5.30 वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.