कीर्तन व स्वतःचे आदर्श आचरण याद्वारे बहुजन समाजातील मागासवर्गीयांमधील अंधश्रद्धा त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीची उदासिनता घालविण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या संत गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगांवी झाला. त्यांचे मुळ नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर व आईचे नांव सखुबाई होते.
वडिल झिंगराजी जाणोरकर परीट सधन शेतकरी होते. त्यावेळचा परीट समाज मागासलेला होता. जन्म-मृत्यू-लग्न या तिन्ही कार्यात त्यांची समजूत होती की मासांचा व दारुचा नैवेद्य झालाच पाहिजे. देवकार्य असो, नाहीतर पाहुणा येवो, दारुची बाटली झालीच पाहिजे. दारु देणार नाही, तो धर्म बुडव्या, सारी परीट जात अशा फंदात अडकलेली. झिंगराजी त्यातून कसा सुटणार? हळूहळू तोही दारुच्या बाटलीत बुडाला. सर्वस्वाला मुकून फुफ्फुसाच्या रोगाने अंथरुणात खिळला, घर दार, शेतीवाडी, गुरे ढोरे सार्यांची आधीच वाट लागली होती. जवळ एक पैसा नाही. मग कसले औषध, रोग बळावत गेला 1884 साली कोतेगावी झिंगराजीने प्राण सोडल.
झिंगराजीच्या मृत्युने सखूबाईंवर कुर्हाड कोसळली. लहानग्या डेबुला घेवून ती मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरा गावी आली. दापुर्यात तिचे वडिल हंबीरराव व भाऊ चंद्रभानजी होते. हंबीरराव सधन होते त्यांच्याकडे बर्यापैकी घर व शेतीवाडी होती. लहान डेबू मामाच्या घरी वाढू लागला. मोठा होवू लागला. त्याने मामाच्या गायी-म्हशी रानात चारायला ने-आण सुरुवात केली. रोज पहाटे उठून गोठा साफ करणे, जनावरांना स्वच्छ ठेवणे इ. कामे तो आवडीने करी. त्याची मामी कोमुकाबाई ही सुद्धा पहाटे उठून जात्यावर ओव्या-पदे म्हणायची, डेबूजी ती पदे नीट लक्ष देवून ऐकायचा व पाठ करायचा.
गाडगेबाबांचे लग्न 1892 साली कुंताबाईंशी झाले, पण ते संसारात विशेष रमले नाही स्वतःला शिक्षण बिलकुल घेता आले नाही, तरी बुद्धी प्रखर, चिकित्सक असल्यामुळे त्यांना बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा व व्यसने यात बुडून स्वतःच बरबाद करुन घेत असल्याचे कळून आले आणि म्हणून त्या समाजाच्या ÷उद्धारासाठी त्यांच्यात जागृती करण्याचे त्यांनी ठरविले.
विविध रंगाच्या चिंध्यांच्या अंगरखा घालून अर्धे मडके डोक्यात घालायचे. दोन मोठ्या खोपर्या हातात घ्यायचे आणि त्यांचे कीर्तन सुरु व्हायचे.
देव किती आहेत? लोक म्हणायचे-एक
बाबा म्हणायाचे, तुमच्या गावात म्हसोळा आहे का? लोक म्हणायचे आहे. देव किती आहे? लोक म्हणायचे-दोन, तुमच्या गावा मरीमाई आहे का? लोक म्हणायचे आहे. बाबा म्हणायचे देव किती झाले? लोक म्हणायचे तीन, अशी संख्या वाढायची एका देवाचे दहा देव कसे झाले? आणि मग गाडगेबाबा म्हणायचे दव देवळात नाही देव माणसात आहे.
बाबा पुढे सांगत शिक्षण घ्या तुम्ही असे देवाची पुजा करीत बसाल, पण माणसाची पुजा कोण करणार? गरीब माणसात देव पाहा त्या गरिबाची सेवा करा. गरीबानेच गरीबाला मदत करायची. मुलाला शाळेत घाला. शिकवा न शिकलेला माणूस म्हणजे पशू पैसे नाहीत म्हणून बायकोस भारी लुगडं घेवू नका. थोडं कमी किंमतीच घ्या आणि राहिलेल्या पैशातून पोराला शिकवा शाळेत गेल्याशिवाय विद्या येणार कशी, विद्या आल्याशिवाय माणूस होणार नाही गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा!
त्यांच्या कीर्तनात अंधश्रद्धेवर प्रहार करणारा, कर्मकांडांवर तूटून पडणारा प्रत्येक शब्द लोक कानांत प्राण आणून ऐकत. भारदस्त आवाजातील त्यांचा ‘गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा’ हा गजर लोकांना मंत्रमुग्ध करीत होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण या गावी बाबांचे कीर्तन होते. 25 ते 30 हजार लोक देवकी नंदन गोपाळा च्या गजरात न्हाऊन निघाले होते. गावात विजेची सोय नव्हती माईक नव्हता. टिपर चांदणे पडले होते. एक दोन कंदील कीर्तनाच्या जागी लटकले होते. संत गाडगे बाबांचे कीर्तन जोरात सुरु होते. कीर्तन चालू असतांना एक तार घेवून पोस्टमन आला. बाबांना आलेली ती तार गोविंदाच्या बाबांच्या एकुलता एक मुलाच्या मृत्यूची होती. कीर्तनात तारेतील बातमी कशी सांगावी याचा विचार करीत तो उभाच राहिला. तेवढ्यात बाबा त्याला ओरडले, अरे उभा का आहेस? बस खाली! या संधीचा फायदा घेवून पोस्टमन ने सांगितले, बाबा, आपला गोविंदा वारला हो, ही तार आलीय हे शब्द ऐकून बाबा क्षणभर शांतपणे उभे राहिले. एक क्षण झाला नि एकदम निर्विकार मुद्रेने ते मोठ्याने म्हणाले.
मेले ऐसे कोट्यानु कोटी
काय रडू एकासाठी!
एकुलता एक मुलाच्या मृत्यूचे दुःख गिळून ते पुन्हा कीर्तनात दंग झाले आपल्या तरुण मुलाच्या अकस्मात मृत्यूचे दुःख विश्व नामात बुडून बाबा मोकळे झाले. यासाठी जी समवृत्ती लागते. ती बाबांनी त्यांच्या विलक्षण साधनेने कधीच गाठलेली होती. त्यामुळे माया लोभ अशा विकारापासून ते दूरच होते. त्यांचा देव देवळात नव्हता, मुर्तीत नव्हता, पुजेत नव्हता, महापुजेत नव्हता, तिर्थात नव्हता, धोंड्यात नव्हता, फुलांच्या संसारात नव्हता, आरतीत नव्हता, त्यांचा देव माणसात होता. माणसाला देव माणून माणसांची सेवा करा, गरीबांची सेवा करा हा बाबांचा संदेश होता.
गाडगेबाबांचे शेवटचे कीर्तन 18 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईला बांद्र पोलिस स्टेशनच्या मोकळ्या जागेत झाले. बाबांचे शेवटचे कीर्तन ऐकतांना अंगावर रोमांच येत होते. कीर्तन संपता संपता बाबा त्यांची भावना इतक्या उंच टोकाला नेतात की डोक्यातून पाण्याची धार लागावी बाबा सांगतात, हे माझे शेवटचे कीर्तन आहे. बांद्राच्या पोलीस लोकांनी हे कीर्तन आयोजित केले म्हणून तुमच्या रुपाने देव भेटेल, कारण देव लोकांमध्ये आहे. माझं आता काय खरं नाही. माझं मरण मला समोर दिसते आहे आणि म्हणून कोणास काय बोललो असेल तर माफी करा बाबांचे ते शब्द ऐकून सारी सभा स्तब्ध झाली आहे. भारावलेल्या बाबांनी मरणाचा अप्रिय विषय काढता तरी त्यांच्या समवृत्तीची घालमेळ झालेली दिसत नाही. बाबा स्वतःसाठी जगत नव्हते, सर्वांच्यसाठी जगत होते. महाराष्ट्राच्या तत्कालिन लोकजीवनाची नेमकी नस ओळखून समाजाची अधोगती रोखण्यासाठी ज्या निवडक धुरीणांनी आयुष्य वेचले त्यापैकी गाडगेबाबा एक होते. स्वत:च्या आयुष्यात जे भोगावे लागले त्याच स्वानुभवाच्या शाळेतून मिळालेले संस्कार व जीवनदृष्टी पुढच्या आयुष्यात गाडगेबाबा वास्तवात जगले. निर्मोही राहून देवाची भक्ती समाजाला रचनात्मक मार्गाने समजावून सांगणारे व समाज परिवर्तनाचा जीवापाड आग्रह धरणारे गाडगेबाबा त्याकाळात छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही आदराचे स्थान होते.सारासारविवेकाची समाजाला दिशा देणारा हा द्रष्टा संत कृतीभक्तीचाही आदर्श होता. बंधुभावाचा चालताबोलता अविष्कार होता.
देहू, आळंदी अशी तीर्थक्षेत्री त्यांनी यात्रा करुन विनामुल्य राहता यावे, यासाठी धनिकाकडून देणग्या मिळवून सर्व सोयीन युक्त मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. श्रीमंतांकडून देणारे पक्वानायुक्त जेवण ते गरिबांना देत व स्वतः आपल्या मातीच्या मडक्यात कुणा गरिबांकडून चटणी भाकर मागून ती ते खात सामाजिक कार्य करणार्याचा अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली. 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावतीत त्यांचे निधन झाले. गाडगेबाबांच्या नावाने सुरु झालेले स्वच्छता अभियान महाराष्ट्रातल्या गावोगावचा कचरा दूर करो, रस्त्याचा कचरा साफ होतो. मनामनामध्ये जो अमंगल आहे, तेही साफ होवो! आणि एका समर्पणाच्या अतिउच्च भावनेवर महाराष्ट्राचे सार्वजनिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवन जावो, हीच त्यांना महाराष्ट्राच्या समुहजीवनाची उत्कंट श्रद्धांजली!
– सर्जेराव बेडीस्कर
9970770099