तर्कशास्त्राद्वारे समस्या निराकरण

0

भुसावळ । निर्णय क्षमता, चिकित्सक विचार आणि तर्कशास्त्राद्वारे विचार करायला लावून जीवनात येणार्‍या विविध समस्यांचे निराकरण करण्याचे काम गणित विषय करत असतो. जगणे सुसह्य करणार्‍या गणित विषयाची भिती मुलांच्या मनातून काढून ज्ञानरचनावाद व शैक्षणिक साहित्यातून गणित अध्यापनाची प्रक्रिया सुलभ करावी, असे आवाहन जळगाव येथील डिआयईसीपीडीचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.चंद्रकांत साळुंखे यांनी येथे केले.

भुसावळ नगरपरिषदेतर्फे द.शि. विद्यालयात आयोजित दोनदिवसीय शिक्षण परिषदेच्या प्रथम दिवसाच्या कार्यशाळेत गणित संबोध या विषयावर डॉ. साळुंखे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. प्रारंभी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, डॉ.चंद्रकांत साळुंखे यांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे यांनी शिक्षण परिषद आयोजनाबाबतचा हेतू सांगितला.

नगराध्यक्ष रमण भोळे यांनी नगरपालिका शाळांविषयी पालकांच्या मनात असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन करत शिक्षकांनी बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिकतेची कास धरून विद्यार्थ्यांना शिकवावे, असे सांगितले. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्याचे काम पालिका करणार असल्याचे सांगून शिक्षकांनी देखील आपले कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवून भावी पिढी घडविण्याचे आवाहन केले.

गणित संबोध संकल्पनेचा वापर करावा
त्यानंतर डॉ.चंद्रकांत साळुंखे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत गणित संबोध ही संकल्पना विविध उदाहरणे देवून शिक्षकांना पटवून दिली. शिक्षक मुलांना जे सांगतात ते दाखवता व मांडता आले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक साहित्याशिवाय गणित शिकविता येत नाही. अंकांच्या बाबतीत इंग्रजीत फक्त 27 शब्द नवीन तर मराठी भाषेत मात्र 72 शब्द नवीन आहेत. अशावेळी विविध उदाहरणातून अंकभाषा व गणित विषयातील संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांनी गणित संबोध संकल्पनेचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर यांनी मुलांच्या भावविश्‍वानुसार त्यांच्याशी संवाद साधून अध्यापनाची प्रक्रिया आनंददायी करण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन एस.एस. भोई यांनी तर आभार मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे यांनी मानले. यावेळी भुसावळ नगरपरिषद संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

आज विविध विषयांवर मार्गदर्शन
नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या पत्रानुसार भुसावळ नगरपरिषदेतर्फे नगरविकास सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत द.शि. विद्यालयात शिक्षण परिषद होत आहे. मंगळवार 25 रोजी ज्ञानरचनावाद व डिजीटल या विषयावर पौर्णिमा राणे, शाळासिद्धी या विषयावर प्रमोद आठवले, विज्ञानदृष्टी या विषयावर प्रकाश कोळी तर स्पोकन इंग्लिश या विषयावर माजी मुख्याध्यापक बी.आर. पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर शिक्षण परिषदेचा समारोप गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बुधवार, 26 रोजी द.शि. विद्यालयात सकाळी 8 ते 11 शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन तर 27 रोजी सकाळी म्युनिसिपल हायस्कुलमध्ये निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सहभागाचे आवाहन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शिक्षण सभापती शैलजा नारखेडे, प्रशासन अधिकारी डि.टी. ठाकूर, मुख्याध्यापिका राजश्री सपकाळे, मुख्याध्यापिका एम.यु. गोल्हाईत यांनी केले आहे.