खासदार सुप्रिया सुळे यांनी केले पगारवाढीचे समर्थन
बारामती : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी अजित पवार यांना सांगेन, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारवाढीचे जोरदार समर्थन केले.
बारामती नगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाला प्राधान्य दिले. त्याला आम्ही सर्वांनी मनापासून पाठिंबा दिला. मात्र, असर या संस्थेच्या वार्षिक अहवालात गेल्या चार वर्षात केवळ दहा टक्के शौचालयांचीच नव्याने निर्मिती झाल्याचे नमूद केले आहे, ही बाब दुर्देवी आहे. प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालयाच्या निर्मितीची पंतप्रधानांची घोषणाही हवेतच विरून गेली आहे, असे सुळे यांनी सांगितले.
‘वयोश्री’चे बारामतीत सर्वोत्तम काम
केंद्राच्या वयोश्री योजनेअंतर्गत पंतप्रधानांच्या वाराणसीपेक्षाही बारामतीत सर्वोत्तम काम झाले आहे. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांमुळे आगामी काही महिन्यात जवळपास पंधरा कोटी रुपयांच्या वस्तूंचा लाभ लोकसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मिळणार आहे, याचा मला अभिमान वाटतो. अंगणावाडी इमारतींना स्ववास्तू हवी, वीजबिल शासनाने भरावे व पिण्याचे पाणीही द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पुढे सांगितले.