…तर अंगणवाड्या शाळेत भरवा

0

राज्याच्या महिला, बालकल्याण विभाग सचिव विनिता सिंघल यांची सूचना

पुणे । बालकांना प्राथमिक पूर्व शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. जिल्ह्यात अंगणवाड्या भरविताना जागेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या रिकाम्या वर्गात भरवा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्राधान्याने लक्ष घालून अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेतील यशवंतराव सभागृहात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यस्तरीय विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. असीम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव गिरीष भालेराव उपस्थित होते.

बचतगटांना कामे द्या
सेविकांचा वेळ अन्न शिजवणे आणि बालकांना खाऊ घालण्यात जात आहे. तसेच पोषण आहार मिळतो म्हणून मुलांना अंगणवाड्यात बसविणार्‍या पालकांची मानसिकता बदलावी आणि सेविका आणि मदतनीस यांचा वेळ वाचावा यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अन्न शिजवण्याचे काम बचत गट किंवा महिला मंडळांना द्यावे, अशी सूचना सिंघल यांनी केली आहे. दरम्यान, पालघर, नंदुरबार, कोकण विभागातील अनेक तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण मोठे आहे. या कुपोषित बालकांना योग्य आहार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळावे. तसेच कुपोषित बालकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी प्राधान्याने काम करावे, अशी सूचनाही सिंघल यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

ग्रामपातळीवर चर्चा करा
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अंगणवाड्या नसतील तर जिल्हा परिषदेच्या रिकाम्या वर्गात अंगणवाड्या भरवा. मात्र, जिल्ह्यातील सर्व बालकांना प्राथमिक पुर्व शिक्षण मिळालेच पाहिजे. ज्या ठिकाणी अंगणवाड्यांना जागा नाही त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून ग्रामपातळीवर चर्चा करून मार्ग काढावा. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधल्यास हे काम सोपे होईल, असा सल्ला सिंघल यांनी यावेळी दिली. राज्यातील सर्व अंगणवाड्यातील मुलांना पोषण आहार दिला जातो. हे अन्न अंगणवाड्यातील सेविका आणि मदतनीस शिजवतात. त्यामुळे त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया जात आहे. अंगणवाड्यातील बालकांना दररोज किमान पाच तास पूर्वप्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.