…तर अखर्चित निधी जाणार परत

0

24 कोटींचा निधी खर्च करण्यास मनपाला 31 मे पर्यंत मुदतवाढ

जळगाव- शासनाच्या नगरविकास विभागाकडून विविध योजनांतर्गत प्राप्त झालेला अखर्चित निधी खर्च करण्यास शासनाने 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतीत खर्च न केल्यास शासनाकडे परत जाणार आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 25 कोटींपैकी 14 कोटी 88 लाख आणि विशेष मुलभूत सुविधासाठी प्राप्त 10 कोटीपैकी7 कोटी 70 लाख,विशेष रस्ता अनुदानातून 1 कोटी26 लाख असे एकूण 23 कोटी 84 लाखांचा निधी मे अखेर खर्च करावे लागणार आहे.

शासनाकडून विविध योजनांतर्गत 2015 ते 2018 पर्यंत प्राप्त झालेल्या निधीच्या अनुषंगाने ज्या विकासकामांसाठी कार्यादेश देवून अपूर्ण कामे करण्यासाठी 31 मे 2020 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. तसेच 2014-15 मध्ये वितरीत करण्यात आलेल्या आणि अद्याप अखर्चित असलेला निधी तात्काळ शासनास जमा करण्यात यावा असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने मनपाला दिले आहे.

शासनाचे अद्यादेश जारी
जळगाव शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला 25 कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर विशेष मुलभूत सुविधांसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला होता. दरम्यान, 25 कोटींच्या निधीतून 10 कोटी 22 लाखांचा निधी खर्च झाला असून 14 कोटी 88 लाखांचा निधी अखर्चित आहे. तर विशेष मुलभूत सुविधांसाठी 5 कोटी आणि पून्हा 5 कोटी अशा एकूण 10 कोटींच्या निधीतून 2 कोटी 30 लाखांचा निधी खर्च झाला असून 7 कोटी 70 लाखांचा निधी,विशेष रस्ता अनुदानातील 3 कोटी 75 लाखांच्या निधीतून 1 कोटी 26 लाखांचा अखर्चित आहे. त्यामुळे आता 31 मे 2020 पर्यंत 25 कोटी निधीतील 14 कोटी 88 लाख आणि विशेष मुलभूत सुविधामधील 10 कोटी निधींपैकी 7 कोटी 70 लाख असे एकूण 23कोटी 84 लाखांचा निधी दिलेल्या मुदतीत खर्च करावे लागणार आहे. अथवा अखर्चित निधी परत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आता 23 कोटी 84 लाखांची कामे करावी लागणार आहेत.

महिनाभरात कामे पूर्ण करण्यासाठी मक्तेदारांना महापौरांचा अल्टीमेटम
शासनाकडून वितरीत करण्यात आलेला निधी 31 मे पर्यंत खर्च करण्याचे आदेश प्राप्त होताच महापौर भारती सोनवणे यांनी मक्तेदारांची आढावा बैठक घेवून माहिती घेतली. ज्या विकासकामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत ती सर्व कामे महिनाभरात पूर्ण करण्याच्याच्या सुचना महापौरांनी दिल्या. महिनाभरात काम न केल्यास संबंधित मक्तेदारावर कारवाई केली जाईल असा इशारा देखील महापौरांनी दिला.

बिले थांबवित असल्याची मक्तेदारांची कैफियत
मक्तेदारांनी कामे का? थांबविली असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित मक्तेदारांनी आमची बिले थाबंविली असल्याची कैफियत मांडली.यावर महापौरांनी कामे पूर्ण करा,तुमची बिले कोणीही अडवणार नाहीत असे मक्तेदारांना आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत पूर्ण काम होणार नाही तोपर्यंत बिले दिले जाणार नाही असेही महापौरांनी स्पष्ट केले. बैठकीला उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे,स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा,भगत बालाणी कैलास सोनवणे यांच्यासह मुख्यलेखा परिक्षक संतोष वाहुले,मुख्य लेखाधिकारी कपील पवार उपस्थित होते.