ना. गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव– पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला पहिला अजेंडा असणार आहे. सोबतच प्रशासनातील मस्तवाल अधिकार्यांना वठणीवर आणून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर असेल. अधिकार्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र, शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून कामे करून घेऊ, असा खणखणीत इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे आज (बुधवारी) दुपारी पहिल्यांदा जळगावात दाखल झाले. शिवसेनेच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी तसेच बँजो बँडच्या गाण्यांवर थिरकत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, शिवसेनेच्या वाट्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद आल्याने शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांची भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. रेल्वे स्थानकाच्या फलाटापासूनच कार्यकर्त्यांनी वाद्य वाजवण्यास तसेच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी देखील झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दी पांगवल्याने अनर्थ टळला. रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक नेहरू पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक संपली.