पुण्याच्या क्रस्ना डायग्नोस्टीक कंपनीचा भुसावळ पालिकेला प्रस्ताव: आमदारासंह नगराध्यक्षानी दर्शवली सहमती
भुसावळ: भुसावळकरांना सिटी स्कॅनसह एमआरआय व रक्त लघवी तपासणी प्रचलित दरापेक्षा अगदी निम्म्या किंमतीत पुरवण्याबाबत पुण्याच्या क्रस्ना डायग्नोस्टीक कंपनीने सोमवारी प्रस्ताव देत त्याबाबत प्रांताधिकारी कार्यालयात सादरीकरण केले. पालिकेला संबंधित कंपनीला जागा पुरवायची असून बांधकामासह मशनरीचा तसेच डॉक्टरांच्या टीमचा सर्व खर्च संबंधित कंपनी करण्यास तयार असल्याने पालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास ही भुसावळकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.
प्रचलित दरापेक्षा निम्मे दर
प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी पुण्याच्या क्रस्ना डायग्नोस्टीक कंपनीचे प्रतिनिधी कपिल देशमुख यांनी ऑनलाईन माहिती दिली. त्यात संबंधित कंपनी आतापर्यंत 17 राज्यात सेवा पुरवत असल्याचे त्यांनी सांगत पुणे महानगरपालिकेसह अन्य महानगरपालिकांमध्ये सेवा बदिली जात असल्याचे ते म्हणाले. खाजगी रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनसह एमआरआय समजा चार हजार रुपये घेतले जात असेल तर आमची कंपनी केवळ 1500 ते 1600 रुपये दर आकारत असल्याने गोरगरीब रुग्णांना ही मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे ते म्हणाले. संबंधित कंपनीला केवळ पालिकेने जागा पुरवायची असून त्यानंतर बांधकामासह मशनरी व संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक कंपनी स्व-खर्चातून करेल मात्र प्रत्येक रुग्णामागे आकारली जाणार फी स्वतः कंपनीला मिळणार असल्याचेही ते म्हणाले. नगरपालिका दवाखान्यायाला लागून असलेली जागा पाहिली असून ती योग्यही असल्याचे ते म्हणाले. 365 दिवस 24 तास कंपनीतर्फे पुरवली जात असल्याचेही त्यांनी सांगत 15 ते 30 वर्ष करार केला जातो, असेही ते म्हणाले.
अल्पदरात मिळणार सुविधा -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळच नव्हे तर रावेर लोकसभा क्षेत्रातील रुग्णांना अल्पदरात या माध्यमातून सुविधा उपलब्ध होवू शकते. सिटी स्कॅन वा एमआरआय करावये म्हटल्यास रुग्णासह नातेवाईकांना रुग्णवाहिका करून जळगाव गाठावे लागते शिवाय त्यात वेळ व पैशांचा अपव्यय होतो मात्र स्थानिक स्तरावर ही सुविधा अल्पदरात मिळाल्यास ती मोठी उपलब्धी ठरणार आहे.
आरोग्याचे प्रश्न मार्गी लागणार -नगराध्यक्ष
संबंधित कंपनीशी करार केल्यानंतर अल्पदरात भुसावळकरांना सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आरोग्याचे प्रश्न या माध्यमातून मार्गी लागतील शिवाय सभागृहात या संदर्भात सर्व नगरसेवकांचे मत विचारात घेवून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे ते नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले.
तर गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा
राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भुसावळात अपघात नित्याचेच आहेत तर अप्रिय घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचा एमआरआयसह सीटी स्कॅन काढायचा म्हटल्यास रुग्णाला रुग्णवाहिकेतून जळगाव न्यावे लागते शिवाय यात वेळ व मोठ्या प्रमाणावर पैसा जातो मात्र स्थानिक स्तरावर या सुविधा अगदी अल्प किंमतीत मिळाल्यास गोरगरीब रुग्णांचा मोठा त्रास वाचणार असून विभागासह रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरीकांनाही त्यातून मोठा दिलासा मिळणार आहे. पालिका प्रशासन व सत्ताधार्यांनी सकारात्मक पद्धत्तीने निर्णय घेण्याची आशा आहे.