…तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपून जाईल

0

लंडन । पैशांच्या बाबतीत आयपीएलच्या कमाईत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. स्टारने आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार मिळवण्यासाठी तब्बल 16,347.50 कोटी रुपये मोजले. 10 वर्षांमधल्या आयपीएलच्या यशाचे हे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. यानंतर आता आयपीएलच्या भविष्याबाबत आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी भविष्यवाणी वर्तवली आहे. एकवेळ अशी येईल जेव्हा आयपीएल खेळणार्‍या खेळाडूला प्रत्येक सामन्याचे जवळपास दहा लाख डॉलर म्हणजेच 6.60 कोटी रुपये मिळतील. पण त्यामुळे दोन देशांमध्ये होणारे क्रिकेट आयपीएलमुळे संपेल, अशी ललित मोदींना वाटत आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र डेली टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये ललित मोदींनी हे वक्तव्य केले आहे.

आयपीएल ही जगातली सगळ्यात प्रभावशाली क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या फ्रँचायझींचे मालक कुबेर आहेत आणि भारतात क्रिकेट हा धर्म आहे. त्यामुळे प्रायोजक आणि प्रसारकांसाठी ही दुभती गाय असल्याची प्रतिक्रिया ललित मोदींनी दिली आहे. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. स्टोक्सला एका मोसमासाठी 19.5 लाख डॉलर देण्यात आले आहेत. जर 1 कोटी 20 लाख डॉलरची मर्यादा हटवण्यात आली तर आयपीएलच्या प्रमुख खेळाडूंना इंग्लिश प्रीमिअर लीग आणि एनएफएल स्टार्सप्रमाणेच पैसे मिळतील. खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 10-20 लाख डॉलर सहज मिळतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच काहीच महत्त्व राहणार नाही, अशी भविष्यवाणी ललित मोदींनी केली आहे.