…तर आज भारत जगातील प्रगत राष्ट्र असते

0

वाघोली । लोकांनी जाती, धर्म आणि धर्मग्रंथाला जास्त महत्त्व दिले. धर्मग्रंथापेक्षा राज्यघटनेला जास्त महत्व दिले गेले असते, तर आज भारत हा जगातील सर्वात प्रगत राष्ट्र असता. नागरिकांनी जाती धर्मात न अडकता भारतीय संविधानाला महत्त्व देऊन आपल्या अधिकाराबाबत जागृत राहिले पाहिजे, असे मत प्रहार अंपग क्रांती आंदोलन संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेन्द्र सातव यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधान दिनानिमित संत गाडगेबाबा अंध अंपग भूमिहीन बेघर सघंटनेच्या वतीने केसनंद फाटा येथे भारतीय संविधानाच्या (राज्यघटना) प्रतीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया लोखंडे, कैलास कुसाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. साहेबराव जगताप, ज्ञानदेव मेहेञे, भिमराव डावरे, बापू कोकरे, अनिता काबळे, राहूल वानखेडे, यशवंत जाधव याप्रसंगी उपस्थित होते.

घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. पण नागरिकांना आपले हक्कच माहित नाहीत. जनतेसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या पैशात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. यामुळे देश स्वातंत्र्य होऊनही रोजगार, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, रस्ते, वीज, पाणी यासारखे मूलभूत प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. याला कारण की राज्यकर्ते, प्रशासन आणि नागरीकांनी राज्यघटना पूर्णपणे समजून घेतलीच नाही. तसा प्रयत्न ही केला नाही, असे सातव यांनी पुढे सांगितले. नागरिकांनी समाजाच्या, स्वतःच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील रहावे, असेही ते म्हणाले.

राजकारणी करतात पदाचा दूरउपयोग
नागरिकांना आपले हक्कच माहित नसल्यामुळे राजकारणी व प्रशासनातील अधिकारी पदाचा दूरपयोग करून सर्वसामान्य जनतेला मूलभूत सोयी सुविधापासून वंचित ठेवत आहेत. राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत प्रत्येक भारतीय नागरिकाला जाणीव असणे गरजेचे आहे, असे सातव यांनी सांगितले.