नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीने म्हटले आहे की, आपण आणखीन कमीत-कमी 10 वर्ष तरी क्रिकेट खेळू शकतो. फिटनेस चांगला असला तर क्रिकेट नक्कीच खेळेल असा विश्वास विराटने व्यक्त केला आहे.
विराट कोहलीचे वय आता 29 वर्ष आहे. तो गेली 9 वर्ष क्रिकेट खेळत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौर्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये विराटने दोन शतके झळकावली. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग याच्या 30 शतकांची बरोबरी केली. सर्वाधिक शतके करणार्यांच्या यादीत विराट कोहली दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अव्वल स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (49 शतके) आहे. विराट कोहलीने म्हटले की, चांगला खेळ व्हावा, त्यात सुधारणा व्हावी यासाठीच माझा प्रयत्न असतो. अनेक लोकांना हे सुद्धा माहिती नाही की आम्ही दररोज किती मेहनत करतो. सर्वच खेळाडू खूप मेहनत घेतात आणि ट्रेनिंगही पूर्ण करतात. आम्ही काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो.