…तर आमदारकीचा राजीनामा द्या

0

आ. राजूमामा भोळेसमोर नागरिकांनी व्यक्त केला रोष; काव्यरत्नावली चौक ते गिरणाटाकी पर्यतच्या रस्त्यासाठी आंदोलन

जळगाव : काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकीपर्यंत रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी भाजपच्या नगरसेविका उज्जवला बेंडाळे ,गायत्री राणे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान,संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याचे काम करा अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या अशा शब्दात आमदार राजूमामा भोळे यांच्यावर रोष व्यक्त केला. यावेळी आठवडाभरात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्वच रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करुनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे भाजपच्या नगरसेविका उज्जवला बेंडाळे ,गायत्री राणे यांच्या नेतृत्वात रामानंदनगर परिसरातील नागरिकांनी गिरणा टाकी रोडवर रास्ता रोको आंदोलन करत मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. आंदोलन सुरु असतांना आमदार राजूमामा भोळे आणि नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देताच नागरिकांनी त्यांना घेराव घालत संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान,आठवडाभरात रस्ता दुरुस्तीचे त्यांनी आश्वासन दिले.

आठवडाभरात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकीपर्यंत रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा. नितीन बरडे, बंटी जोशी आणि भाजपच्या नगरसेविका उज्जवला बेंडाळे यांनी महासभा आणि स्थायी समिती सभेत मागणी केली होती. त्यामुळे केवळ जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानासमोरच दुरुस्ती केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.दरम्यान,नागरिकांची समजूत काढत आठवडाभरात दुरुस्तीचे काम करण्याचे आश्वासन आमदार राजूमामा भोळे आणि कैलास सोनवणे यांनी रामानंद नगरातील नागरिकांना दिले.

रस्त्यांची बिकट अवस्था

अमृतअंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम केले आहे. काव्यरत्नावली ते गिरणाटाकी पर्यंतचा रस्ता देखील खोदलेला आहे. मात्र व्यवस्थीत न बुजविल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. रस्ता व्यवस्थीत न बुजविल्यामुळे मक्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.