पुणे । जुन्नर तालुक्यातील देवळे गावात साथीचे आजार वाढले आहेत. परंतू, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुर्या सोयी-सुविधांमुळे या आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. मागील काही दिवसात उपचार वेळेत न मिळाल्यामुळे एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केली आहे. दरम्यान, देवळे आरोग्य केंद्रात त्वरीत डॉक्टरांची नेमणूक करावी, यासाठी येत्या सोमवारी (दि. 18) जिल्हा आरोग्यधिकार्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. देवळे गावातही तीच परिस्थिती आहे. ग्रामस्थांच्या सोयीसाठी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. मात्र, डॉक्टरांची अपुरी संख्या आणि तटपुंज्या सोयी-सुविधा यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. आदिवासी भागात याहीपेक्षा बिकट परिस्थिती असल्याचे लांडे यांनी सांगितले. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सोयीनुसार पदाच्या ठिकाणी बदलून जात आहेत. तसेच अधिकारी आणि कर्मचारी केवळ कागदोपत्री आदिवासी भागात काम करत असल्याची माहिती प्रशासनाला देत आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
अधिकार्यांवर कारवाई करा
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि आरोग्यसेवक उपलब्ध नसल्यामुळे आदिवासी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच आदिवासी भागात काम करत असल्याची खोटी माहिती देऊन आरोग्य विभागातील अनेक अधिकारी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहेत. अशा सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी लांडे यांनी केली आहे.
डॉक्टरांअभावी तिघांचा मृत्यू
शासनाच्या आदेशानुसार आदिवासी विभागातील आरोग्य कर्मचार्यांच्या सर्व रिक्त जागा भरणे बंधनकारक आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील आपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरच गायब झाले आहेत. तर देवळे उपकेंद्रातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आदिवासी भागातील जनतेकडे लक्ष नसल्यामुळे नागरिकांचा औषधोपचाराअभावी जीव जात असल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे.
कामचुकार कर्मचार्यांवर करणार कारवाई
देवळे प्राथमिक उपआरोग्य केंद्रात मृत्यू पावलेल्या रुग्णांचा चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. तर आदिवासी विभागात कामचुकारपणा करणार्या डॉक्टर व कर्मचार्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. दिलीप माने यांनी याबबात बोलताना सांगितले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे. परंतु, डॉक्टरांच्या अपुर्या मनुष्यबळामुळे काही ठिकाणी आरोग्य सेवा देण्यात अडचणी येत आहे. मात्र, ही अडचण येणार नाही. त्यादिशेने प्रयत्न करण्यात येत आहे. तर जुन्नर तालुक्यातील देवळे उपकेंद्रातील प्रकरणाचा अहवाल मागविण्यात येणार आहे, असे बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.