तर ‘ईट का जवाब पत्थर से’ दिला जाणार !

0

शिंदखेडा । विकास कामांसाठी मतदारांनी भाजपाला शिंदखेडा नगरपंचायतीत बहुमत दिले आहे. मतदारांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. शहरात विविध विकासकामे आम्ही करू, मात्र विकासकामे होत असताना कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही व ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा, असा इशारा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांना दिला. आभार सभेप्रसंगी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दयाराम माळी होते.

विविध कामे मार्गी लावणार
यावेळी बोलतांना ना.रावल म्हणाले, या निवडणूकीत भाजपाचा एकतर्फी विजय झाला आहे. मतदारांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. शहरातील पाणी योजनेच्या कामाला गती देवून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होवून शिंदखेडयाच्या नागरीकांना नियमित पाणी पुरवठा होईल या अभिवचनाचा पूर्नउच्चार त्यांनी केला.याशिवाय भाजीमंडई, स्वच्छतेचा प्रश्‍न, अंडरग्राऊंड गटारी, टाऊन प्लनिंग, व्यायाम शाळा, आदि कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कटिबध्द आहोत.शहरातील स्टेशन रोड वरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शॉपींग सेंटरचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी सभेला उपस्थित असलेले बाजार समिताचे अध्यक्ष नारायण पाटील यांना दिले.

काँग्रेसवर टीका
ना.जयकुमार रावल यांनी या सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. निवडणूक काळात भाजपाचे लोकप्रतिनिधी डोक्यावर बर्फ ठेवून असतात. प्रचारा दरम्यान सर्वच पक्षांनी खालच्या पातळीवर जावून भाजपावर टीका केली. या विषारी प्रवृत्तीला खतपाणी घालणे यापूढे होवू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यापूढे अशा विष प्रवृत्तीला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. डॉ.हेमंत देशमुख यांनी साखर कारखाना खाल्ला, दोंडाईचा येथे पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत घरं गरीब व बेघरांना न देता आपल्याच जवळच्यांनाच दिली.मात्र शिंदखेडयात नगरपंचायतीतर्फे असे होणार नाही. कॉग्रेसची सत्ता होती तरी देखील शहरातील पाणी समस्या कायम राहिली. कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी कां पाणी प्रश्‍न कां सोडवला नाही असा सवाल ना.रावल यांनी केला. कोणाला संपविण्यासाठी भाजपाने ही निवडणूक लढविली नाही, तर या गावाच्या विकासाचे व्हिजन घेवून लढविली. खूर्चीवर बसण्याअगोदरच कामाला सुरूवात केल्राचे सांगितले.

यांची होती उपस्थिीती
शिंदखेडा येथे गांधी चौकात आयोजीत आभार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा अरविंद जाधव, सरचिटणीस कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, संजिवनी सिसोदे, गटनेते अनिल वानखेडे, नुतन नगराध्यक्षा रजनी वानखेडे, सुभाष माळी, युवराज माळी, अरूण देसले, बापू खलाणे,अशोक देसले, दिनेश सूर्यवंशी, दिपक चौधरी यांसह भाजपाचे नवनिर्वाचीत नगरसेवक उपस्थित होते.नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
ना. जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला शिंदखेडा नगरपंचायत निवडणूकीत स्पष्ट बहूमत मिळाले. भाऊंनी केलेल्या मार्गदर्शनाची परतफेड योग्य वेळ आल्यावर करू, मतदारांनी दिलेल्या भरघोस मतांचा आदर करत, विकासाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीन, मात्र त्यासाठी शहरातील नागरीकांची साथ मिळेल अशी अपेक्षा असल्याचे गटनेते अनिल वानखेडे यांनी सांगितले. याप्रसंगी सुभाष माळी, प्रा.अरविंद जाधव,कामराज निकम, नारायण पाटिल यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.प्रदिप दिक्षित यांनी केले.