पिंपरी-चिंचवड : महापौर नितीन काळजे सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांना वाचविण्यासाठी समितीच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता आहे. या लढाईत निकाल जर विरोधात गेला तर, क्षणाचाही विलंब न करता आपण उच्च न्यायालयात धाव घेऊ, अशी माहिती तक्रारदार घन:श्याम खेडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मृणाल ढोले-पाटील, अॅड. सतीश कांबिये, आनंदा कुदळे, कैलास कुंजीर, ईश्वर कुदळे, नेहाल कुदळे आदी उपस्थित होते.
समितीपुढे नवे पुरावे नाहीतच
घन:श्याम खेडकर पुढे म्हणाले की, आमच्या वकिलांनी महापौर नितीन काळजे यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांनी कुठलेही नवीन पुरावे समितीपुढे दाखल केले नाहीत. काळजे यांच्या शाळेच्या दाखल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापिका यांनी बेकायदेशीररित्या खाडाखोड करून ‘कुणबी’ लिहिले आहे. काळजे यांचे वडील, आजोबा, पणजोबा, चुलते व चुलतभाऊ यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर जातीची नोंद ‘हिंदू-मराठा’ अशी आहे. हे आम्ही समितीच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच काळजे यांना देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याचे नाव एकाचे तर सही दुसर्याची आणि शिक्का तिसर्याचाच आहे. ही बाबदेखील समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे काळजे यांचे जात प्रमाणपत्र वैध का मानावे, असा सवाल समितीला केला असल्याचे खेडकर यांनी सांगितले.
सारे काही आरक्षणाच्या लाभासाठी!
मृणाल ढोले पाटील म्हणाल्या की, आम्हीही त्याच गावात राहतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्वापार पिढीजात ओळखतो. त्यांचे रोटी-बेटी व्यवहार बघतो, लग्न समारंभात भाग घेतो. गावात काळजे कुटुंबीय हे 96 कुळी मराठा म्हणूनच ओळखले जातात. मग हा समज चुकीचा आहे का? मग गावात वावरताना उच्चवर्णीय म्हणून वावरायचे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी फक्त मागासलेले आहे, असे दाखवायचे हे वागणे चुकीचे व इतर समाजावर अन्याय करणारे आहे. जात पडताळणी समितीवर राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सत्य बाहेर येण्यासाठी जात पडताळणी समितीसमोर सादर केलेले काही पुरावे आम्ही माध्यमांसमोर मांडत आहोत, अशी माहिती मृणाल ढोले पाटील यांनी दिली.