पुणे : एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या राजपत्रित व अराजपत्रिक व इतर पदांसाठी येत्या ११ ऑक्टोबर व २२ नोव्हेंबर २०२० रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती देण्यापूर्वीच झालेली असल्याने यासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. परंतु, न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती आणल्याने मराठा विद्यार्थ्यांबाबतची भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केलेली नाही. सरकारने मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा परीक्षा केंद्रे उद्धवस्त करण्यात येतील, परीक्षा होऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आले आहे.
शासनाकडून ‘एमपीएससी’ च्या परीक्षामधील एसईबीसीचे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत असा वटहुकूम जारी होत नाही तोपर्यंत ‘एमपीएससी’ च्या परीक्षा घेण्यात येवू नयेत. मराठा आरक्षणाविना एमपीएससीच्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. येत्या ११ आक्टोबर ला महाराष्ट्रातील एकाही परीक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा कांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहुल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक सतिश काळे, परमेश्वर जाधव, अमोल देशमुख यांच्या सह्या आहेत.