श्रीनगर : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 35(ए) मध्ये बदल करून जम्मू-काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या विशेष अधिकारावर घाला घातल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. थोडी जरी ढवळाढवळ केली तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचे संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकवणारा कोणीच उरणार नाही, असा इशारा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात दिला. संविधानातील अनुच्छेद 35 (अ) रद्द करण्यासंबंधी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
विशेषाधिकारात ढवळाढवळ नको
घटनेच्या अनुच्छेद 35(अ) मध्ये बदल केल्यास किंवा त्याच्याशी छेडछाड केल्यास काश्मीरमध्ये डौलाने तिरंगा फडकवणार्या नॅशनल कॉन्फ्रन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टीसारख्या मुख्य प्रवाहातील पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आयुष्य धोक्यात येईल. त्यामुळे काश्मिरी जनतेच्या विशेष अधिकारात कोणतीही ढवळाढवळ खपवून घेणार नाही. त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एनआयएने फुटीरतावादी नेत्यांची धरपकड केली आहे. पण अशी धरपकड करून मुख्य समस्या सुटणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील परिस्थिती काश्मीरमध्ये पुन्हा निर्माण करण्यात पीडीपी आणि भाजप आघाडी यशस्वी होईल, असे त्या म्हणाल्या. 35 अ नुसार जम्मू-काश्मीरमधील आमदार आणि खासदारांना विशेष सवलती देण्यात येतात. घटनेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. काश्मीरप्रश्न सोडवण्याची 35 अ ची आवश्यकता आहे. विशेषाधिकारांवर हल्ला केल्यास हा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.