मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. आज शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतो आहे. दरम्यान त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर विविध प्रतिक्रिया उमटत आये. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत फडणवीस यांनाच जबाबदार ठरविले आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य केले आहे. एका मराठी वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खडसे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी त्याला नकार दिला. प्रदेशाध्यक्ष पद घेतले नसल्यानेच त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली, प्रदेशाध्यक्षच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असतो, त्यामुळे खडसे यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
खडसे यांनी भाजप सोडल्याने भाजपला नुकसान होणार असे नाही मात्र त्यांच्या जाण्याने आम्हाला दु:ख आहे असेही दानवे यांनी म्हटले. उत्तर महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला फारसा फरक पडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.