…तर जळगाव पर्यटनासाठी प्रसिद्धीस येईल!

0

तुहानगरी तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय म्हणजे पर्यटन… मी असं म्हणेन पर्यटन हा विषय काही शिकण्याचा नाही तर प्रत्यक्ष अनुभवायचा असतो. त्यामुळे तो सर्वांचा आवडता असतो. कारण तुमच्या मनाला शांततेचा पूर्णविराम येथेच मिळतो. पर्यटन म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी जाणे आणि तिथल्या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आणि हवा तसा आनंद लुटणे अशी एक ढोबळ संकल्पना समाजात रूढ आहे. एरव्ही धार्मिक कार्यासाठी म्हणून बाहेर पडणार्‍या कुटुंबांची संख्याही भारतासारख्या देशात भरपूर आहे, पण त्याला अद्याप आपण पर्यटनाच्या दृष्टीने चांगले वळण लावलेले नाही. थोडे वेगळे पर्यटन म्हणजे अजिंठा-वेरुळसारख्या लेणींना भेट देऊन तेथील इतिहास आणि कला समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो.यापलीकडे जळगाव सारख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. परंतु, याचा पर्यटन म्हणून फारसा विचार होत नाही. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. म्हणून या विषयावर लिहिण्याचे औचित्य साधले. कारण अवेळी लिखाण करून वाचक पसंती देत नाहीत. असे मी म्हणणार नाही.

असो..! जागतिक पर्यटन दिनानिमित्त राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटनविषयी लिहावे त्यापेक्षा माझ्या जिल्ह्यात किती पर्यटन स्थळे आहेत. त्याविषयीची जनतेला किती माहिती आहे, त्या पर्यटन स्थळांचा पाहिजे तसा विकास झाला आहे का? यावर प्रकाश टाकण्यात मला जास्त धन्यता वाटते. कारण मोठ्या पर्यटन ठिकाणी अनेकांचे लक्ष लागून असते. त्यामुळे माझ्या शहरातील पर्यटनाचा विकास झाला तर जळगाव जिल्ह्यात असलेली लहान मोठी जवळपास पंधराच्या वर पर्यटनस्थळ नावारूपाला येथील. परंतु, त्यांचा विकास करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. इतिहासातील धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून पद्मालय, उनपदेव, गायन महल (फरकांडे), अवचित हनुमान, मनुदेवी, चांगदेव मंदिर, शिवधाम, संत मुक्ताबाई मंदिर, वाघझिरा, इच्छापूर्ती गणेश मंदिर, पाटणा देवी, मंगळग्रह मंदिर, ओमकारेश्‍वर मंदिर, पांडव वाडा (एरंडोल), खंडेराव महाराज मंदिर यांचा विचार करतो, तर ऐतिहासिकमधील पारोळा किल्ला, निसर्गरम्य पाल तसेच नुकतेच स्थापन झालेले. परंतु, प्रसिद्धीत प्रथम स्थानी असलेले गांधी संशोधन केंद्र (काही सुटले असतील क्षमस्वी) एवढे पर्यटनस्थळे जिल्हाभरात आहेत. पर्यटनस्थळांना स्थानिक प्रशासनाकडून सुशोभीकरण करण्याची फार आवश्यक आहे. कारण यामुळे आपल्या सामाजिक परंपरा आपली संस्कृती जोपासून आर्थिक विकास यातून साध्य करता येतो.प्रयेक पर्यटन स्थळ असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागात वार्षिकोत्सव किंवा यात्रा भरवली जाते. यातून स्थानिकांना त्या दिवसांत रोजगार मिळतो. परंतु, पर्यटन म्हणून कायमस्वरूपी या स्थळांची ओळख निर्माण करायची असेल, तर तेथील विकास करणे महत्त्वाचे आहे. जर प्रशासनाने एकदा याविषयी सकारात्मक विचार केला, तर जळगाव जिल्ह्याची पर्यटनासाठी वेगळी प्रतिमा तयार होईल.

– अमोल बाविस्कर
जनसंपर्क अधिकारी,रायसोनी इन्स्टिट्यूट
7798802275