किंग्जस्टन । वेस्टइंडिजविरुद्धच्या एकमेव ट्वेन्टी 20 क्रिकेट सामन्यातील दारूण पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सहकारी खेळाडूंवर टिकेची झोड उठवली आहे. संधी मिळल्यावर त्याचा फायदा उचलता येत नसेल तर मग जिंकण्याचा अधिकारच नाही अशी खंत विराट कोहलीने सामना संपल्यावर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. मात्र त्याचवेळी कोहलीने दोन्ही संघामधील फरकही स्पष्ट केला. कोहली म्हणाला की गेली अनेक वर्ष विंडीजच्या टी-20 संघातील खेळाडू एकत्र खेळत आहे. दुसरीकडे भारतीय संघात बदल होत आहेत. त्यामुळे संघाला चढ उताराचा सामना करायला लागेल. भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या. पण इविन लिव्हसच्या झंझावती फलंदाजींमुळे भारताच्या या आव्हानातील दमच निघून गेला होता.
आणखी धावा झाल्या असत्या
कोहली म्हणाला की, संघाला 230 धावा करता आल्या असत्या. पण फलंदाजांना संधी मिळूनही त्याचा फायदा उचलता आला नाही. संधीचा लाभ मिळवला नाही तर तुम्ही जिंकणार कसे. एकाने तरी सुत्रधाराची भूमिका बजावली पाहिजे होती. 25-30 धावा वाढल्या असत्या.
विंडीजविरुद्धचा एकमेव टी-20 सामना गमावल्यामुळे भारतीय संघाला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. आयसीसीच्या टी-20 क्रिकेटच्या क्रमवारीत भारताची एका क्रमांकाने घसरण झाली आहे. भारताविरुद्धचा सामना जिंकल्यामुळे विंडीजने भारताला मागे टाकत चौथ्या क्रमाकांवर झेप घेतली. तर भारताची पाचव्या घसरण झाली. या यादीत न्यूझीलंड (125) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड (123) आणि पाकिस्तान (121) अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या स्थानावर आहेत. फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर एरॉन फिंच आणि केन विल्यम्सनचा क्रमांक आहे. गोलंदाजीत इमाद वसीम, जसप्रीत बुमराह आणि इम्रान ताहिर अशी क्रमवारी आह
टी-20 सामन्यातील भारतावर मिळवलेल्या सलग तिसर्या विजयामुळे कॅरेबियन संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट खूप आनंदी होता. कार्लोस म्हणाला की, फलंदाजांना मोकळेपणाने फलंदाजी करण्यास सांगितले होते. आमच्या पाठिराख्यांना खूश करायचे होते. त्यामुळे जो अर्धशतक करेल त्याला माझे अर्धे मानधन मिळेल असे सांगितले होते. आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंबद्दल माहिती मिळाली होती. डेथओवरमध्ये भुवनेश्वरकुमार कशी गोलंदाजी करतो ते माहित होते. सुरुवातीला त्याने जास्त षटके टाकावीत असे वाटत होते. मैदानात तसेच घडले.