मुंबई : राज्य सरकारने घातलेल्या काही अटी आणि शर्ती शिथील करत सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारना गुरुवारी परवानगी दिली. यामुळे राज्यभरात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा पूर्ण अभ्यास करून आणि कायदे, न्याय विभागाशी चर्चा करून गरज पडल्यास डान्सबारना बंद करण्यासाठी अध्यादेश काढू, अशी प्रतिक्रीया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
राज्य सरकारने २००५साली डान्सबारवर बंदी आणली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबई आणि इतर काही शहरांमध्ये डान्सबार सुरू होणार आहेत. या सुनावणीवेळी राज्य सरकार आपली बाजू मांडण्यास कमी पडल्याची चर्चा असून समाजातील सर्व स्तरांतून सरकारवर टीका केली जात आहे. अशा स्थितीत सरकारची बाजू सावरण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांची बाजू मांडली.